भावी इंजिनिअरचे भविष्य धोक्यात!

 साई इंजिनिअरिंग कॉलेजचा मनमानी कारभार उघड



चंद्रपूर – शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडगाव येथील नामांकित श्री. साई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यानच संस्थेच्या सहसचिव रोहीणी (रोडे) येरगुडे यांनी थेट परीक्षा दालनात घुसून विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका तब्बल एक तास स्वतःकडे ठेवल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकारामुळे परीक्षार्थींमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, “आमचे वर्ष वाया जाणार का?” असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पॉलिटेक्निक तृतीय वर्षाच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. नियमानुसार परीक्षा काळात कोणताही ड्रेस कोड सक्तीचा नसताना, कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने ड्रेस कोड लादल्याचे समोर आले आहे. “ड्रेस फाटका असला तरी चालेल, नाहीतर नवीन घ्या पण ड्रेस घालाच,” असा अजब फतवा संस्थेच्या सहसचिव यांनी केल्ल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.


दरम्यान, अनेक विद्यार्थी नोकरी करत शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी हा ड्रेस कोड अन्यायकारक ठरत असताना, प्रशासन मात्र आपल्या हट्टावर ठाम असल्याचे दिसते. लाखो रुपये फी भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा किरकोळ कारणांसाठी मानसिक त्रास देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.


इतकेच नव्हे तर, फी थकबाकी असलेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेशपत्र नाकारण्यात आल्याचेही समोर आले आहे. काही विद्यार्थ्यांना तर उसनवारी करून, कर्ज काढून फी भरावी लागली; अन्यथा त्यांना परीक्षेला बसण्यापासूनच रोखले गेले असते. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या जिद्दीवरच जणू गदा आणण्याचा हा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


एकीकडे “गुणवत्तापूर्ण शिक्षण” देण्याचा दावा करणाऱ्या संस्थेचा हा कारभार पाहता, विद्यार्थ्यांचे भविष्य अक्षरशः अंधारात ढकलले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिक्षण संस्थेने शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अन्याय करणे थांबवावे, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही संतप्त विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे.