चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ व इतर वन्यजीवांना त्रास देणाऱ्यांविरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस प्रणित माथाडी कामगार संघटनेचे शहराध्यक्ष अब्दुल जमील शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शेख यांनी म्हटले आहे की, सध्या काही स्वघोषित वन्यजीवप्रेमींनी वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेशी खेळ करत त्यांच्यासोबत फोटो, व्हिडीओ काढणे, त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणे, अशा प्रकारच्या गंभीर प्रकारांना प्रोत्साहन दिले जात आहे. हिंस्त्र प्राणी असलेल्या वाघाच्या अगदी समोर वाहन नेणे, त्याचा रस्ता अडवणे हे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. अशा घटनांमुळे वन्यजीव त्रस्त होत असून त्यांच्या नैसर्गिक वागणुकीवर परिणाम होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, Tadoba Safari Stay Nature's Sprout या रिसॉर्टचे मालक रणवीर सिंग गौतम यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला होता. हा व्हिडीओ सिताराम पेठ ते कांडेगाव रोडवरील असून, यात एक वाघ वाहनाच्या अत्यंत जवळ जात असून वाहन चालकाने त्या वाघाचा रस्ता अडवलेला स्पष्टपणे दिसतो. विशेष म्हणजे, या व्हिडीओवर रणवीर सिंग यांचे नावदेखील दिसते.
अब्दुल शेख यांनी म्हटले आहे की, जर हा व्हिडीओ स्वतः रणवीर सिंग गौतम यांनी शूट केला असेल, तर त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून Tadoba Safari Stay Nature's Sprout रिसॉर्टवर कायमस्वरूपी बंदी घालावी.
पत्रकारांशी उद्धट वर्तन
या प्रकरणावर अधिक माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी रणवीर सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी "तुमचे ओळखपत्र दाखवा, माझ्या व्हिडीओबाबत मला कोणालाही काही सांगायची गरज नाही" असे म्हणत पत्रकारांशी उद्धटपणे संवाद साधला. तसेच, "बातमी करायची असेल तर मी हास्याचे फोटो पाठवतो", असे बोलून त्यांनी वर्तनात हलकेपणा दर्शवला.
वन्यजीव संवर्धनासाठी संपूर्ण समाज जबाबदार आहे. अशा घटना जर वेळीच थांबविल्या नाहीत, तर वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष अधिक गंभीर होऊ शकतो, असे मत अनेक पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.