अस्वस्थ नेते आणि पक्षातील ‘गटयुद्ध’
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी भारतीय जनता पक्षामध्ये अद्यापपर्यंत अंतर्गत समझोता होऊ शकलेला नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार देण्याच्या मुद्द्यावरून किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करून हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
निवडणुकीच्या काळात या वादाचा परिणाम पक्षाला भोगावा लागला आणि अपेक्षेपेक्षा कमी उमेदवार निवडून आले. त्यामुळे काँग्रेस पक्ष बहुमताच्या जवळ पोहोचला, मात्र ‘मॅजिक फिगर’ गाठता न आल्याने महापौरपद आणि सत्ता स्थापनेची संधी भाजपकडे आली.
या संधीचा फायदा घेत सुधीर मुनगंटीवार यांनी रणनीती आखत काही शिवसैनिक आणि काँग्रेसमधील बंडखोर उमेदवारांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा विडा उचलला. परिणामी, संगीता खांडेकर यांना महापौरपद मिळाले.
मात्र, या प्रक्रियेदरम्यान भाजपचा दुसरा गट नाराज झाला होता. हा नाराज गट पुन्हा सक्रिय झाला असून, सत्ता स्थापनेनंतरही गटनेतेपदावरून गदारोळ सुरू आहे. निवडणुकीच्या काळात झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष सुभाष कासनगोटूवार यांनाही पदावरून हटविण्यात आले.
त्याचा वचपा काढण्यासाठी आता कासनगोटूवार आणि त्यांचा गट सक्रिय झाला असून, भाजपचाच महापौर असतानाही त्यांनाच अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
नुकताच भाजपचा वर्धापन दिन पार पडला. या निमित्ताने सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता. यावरून किशोर जोरगेवार यांनी टीका करत पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना प्रवेश दिल्याचा आरोप केला. तसेच, या सोहळ्याच्या संख्येबाबतही त्यांनी मुनगंटीवार यांची खिल्ली उडवली.
विशेष म्हणजे, २०२९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेले चंद्रपूर विधानसभा क्षेत्र भविष्यात आरक्षित राहणार नाही, असे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार आपल्या मूळ विधानसभा क्षेत्रात पुनरागमन करतील, अशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार त्यांनी पक्षबांधणीही सुरू केल्याचे दिसून येत आहे.
यामुळे किशोर जोरगेवार यांच्यातही अस्वस्थता दिसून येत आहे. एकूणच, भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रपूर शहरात अंतर्गत गटबाजी तीव्र होत असून, पुढील काळात हे ‘गटयुद्ध’ अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
