किरकोळ पानठेला धारकांकडून पोलिसांची सर्रास हप्ता वसूली

 


दुर्गापूर पोलीस स्टेशन सध्या गुन्हेगारी घटनांमुळे आधीच चर्चेत असताना आता आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. किरकोळ पानठेला धारकांकडून पोलिसांकडून सर्रास हप्ता वसूली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


नुकतेच रुजू झालेले IPS कायंदेपाटील हे  पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आळा बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदलण्याऐवजी ‘जैसे थे’च राहिल्याचे चित्र आहे. उलट, त्यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलीस आणि हवालदारांना पानठेल्यांवर जाऊन हप्ता गोळा करण्याचे काम सोपवण्यात आल्याचा आरोप आहे.


फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या पानठेला धारकांकडून दर आठवड्याला ठराविक रक्कम उकळली जात असल्याचे सांगितले जाते. “आजवर कोणत्याही पोलीस निरीक्षकांनी आमच्याकडून असा हप्ता घेतला नाही. पानठेल्याच्या उत्पन्नावर आमचे कुटुंब चालते. आता मात्र जबरदस्तीने पैसे मागितले जात आहेत,” अशी व्यथा काही व्यावसायिकांनी मांडली आहे.


धक्कादायक बाब म्हणजे, हप्ता देण्यास नकार दिल्यास कारवाईची धमकी दिली जात असल्याचेही समोर आले आहे. एवढेच नव्हे, तर “हप्ता द्यायचा नसेल तर थेट साहेबांना भेटून महिन्याचा दर ठरवा,” असा सल्लाही संबंधित पोलिसांकडून दिला जात असल्याची माहिती आहे.पोलीस निरीक्षक हे IPS असल्याने त्यांच्या आड हे पोलीस कर्मचारी त्यांच्या नावाने वसुली तर करत नसेल ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. 


या गंभीर आरोपांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.