▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कटिबध्द आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे
औरंगाबाद, दि.07, (विमाका) :- ऊसतोड कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी शासन कृतीशील असून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे राज्यस्तरीय कार्यालय पुणे येथे सुरू करण्यात आले आहे. ऊसतोड कामगारांच्या समस्यांचे निराकरण तसेच त्यांच्या हक्कांसाठी महामंडळ कटिबध्द असल्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आज येथे सांगितले.
औरंगाबाद येथील समाज कल्याण कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ऊसतोड कामगारांच्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्वक जीवनमानासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ऊसतोड कामगार संघटनांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पुण्याचे समाज कल्याण उपायुक्त रवींद्र कदम, औरंगाबाद विभागचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख, नाशिकचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, पुण्याचे प्रादेशिक उपायुक्त श्री.सोळंके, उपायुक्त (लेखा) श्री.खेतमाने, जनसंपर्क अधिकारी संजय देवकाते यांच्यासह कारखानदार, ऊसतोड कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कारखानदार, विविध ऊसतोड कामगार संघटना यांनी ऊसतोड कामगार, मुकादम, ऊस वाहतूकदार यांच्या समस्या मांडून त्यावर उपायायोजना करण्याची यावेळी मागणी केली. ऊसतोड कामगार संघटनांनी उपस्थित केलेल्या विविध समस्या व त्याचे निराकरण करण्याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयात या सर्व बाबींचा समावेश करण्यात येऊन ऊसतोड कामगारांसाठी योग्य व न्याय देणारे धोरण राबविण्यात येणार असल्याचे श्री.नारनवरे यांनी सांगितले.
यावेळी समाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनांच्या यशकथांवर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.