कारवाई करण्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले निर्देश
सावली तालुक्यातील मानकापूर येथे बंधारा बांधकाम नुकतेच करण्यात आले मात्र काम निकृष्ट झाल्याची तक्रार गावकरी व पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी केली होती. मात्र काहीच कारवाई न झाल्याने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कारवाई करण्याचे निर्देश मुख्यकार्यपालन अधिकारी यांना दिले.
सावली तालुक्यातील मानकापूर व चारगाव येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी व पाणी जमिनीत मुरावे यासाठी नाल्यावर सिमेंट प्लग बंधारा बांधकाम जिल्हा परिषद जलसंधारण सिंचाई विभागामार्फत ग्रामीण मजूर सहकारी संस्था भद्रावती यांना प्रत्येकी 13 लक्ष रुपये किंमतीचे काम मिळाले मात्र प्रत्यक्षात काम त्या भागातील पदाधिकाऱ्याचे नातेवाईकाने केले. बांधकामाचे मॉस काँक्रीटसाठी ४० एमएम तर आर सी सी साठी 20 एम एम गिट्टीचा वापर आहे परंतु जास्तीत जास्त40 एम एम गिट्टीचा वापर करण्यात आलेला आहे, पूर्ण क्रांक्रीट न करता मधोमध माती रेती भरलेल्या बॅगनी क्रांक्रीट पूर्ण करण्यात आलेला आहे. बांधकामासाठी १० फूट खोदकाम पोकलन मशिनद्वारे करण्यात आले परंतु दुसऱ्याच दिवशी जोराचा पाऊस आल्याने खोदकाम जैसे ते झाले त्याच्यावरच बंधाऱ्यांची पायाभरणी करण्यात आली, लोहा 3 फुटाचे तुकडे वापरून अत्यंत कमी वापर करण्यात आला अशी माहिती गावकऱ्यांकडून पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांना मिळाली होती. पाहणी अंती बंधारा बांधकाम बोगस झाल्याचे आढळल्याने कोरेवार यांनी चौकशीचे निर्देश दिले. उप अभियंता ननावरे, कनिष्ठ अभियंता गंधे यांनी चौकशी केली यादरम्यान निकृष्ट कामास निस्तारण्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू होते. आज नियोजन भवनातील आयोजित आढावा बैठकीत हे प्रकरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करून मानकापूर व चारगाव येथील बंधाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद चे मुख्यकार्यपालन अधिकारी राहुल कर्डीले यांना दिले.