अन्न निरीक्षक सोनटक्के वर पानटपरी चालकाचा प्राणघातक हल्ला!



(चंद्रपूर विशेष वार्ता)

चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध व राजकीय पार्श्वभुमी असलेल्या "कन्नमवार" चौकात बंदी असलेला सुगंधित पान मटेरियल विक्री करीत असल्याची तक्रार मिळाल्यावरून अन्न व सुरक्षा अधिकारी अमर सोनटक्के यांनी आपल्या वाहन चालकासह कन्नमवार चौकातील येनुरकर यांचा असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. आपले कर्तव्य बजावित त्यांनी यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर सुगंधित तंबाखू मिश्रीत "खर्रा" विक्रेते येनुरकर यांच्या कुटूंबातील सदस्यांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला एवढा घातक होता की त्यामध्ये फुड निरीक्षक अमर सोनटक्के यांचे ओढ फाटले. त्यांच्यावर चंद्रपूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. याठिकाणी "खर्रा" बनविण्याचे मशिनसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून अन्य सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहिते यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कर्तव्य बजावत असतांना एखाद्या अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला होण्याची ही बाब चंद्रपूर जिल्ह्यासाठी येणाऱ्या काळात धोकादायक असल्याचे संकेत आहे. यापूर्वीही दारू तस्करांनी पोलिसांवर हल्ले केले आहे, चिडे नावाच्या पोलीस उपनिरीक्षकांला या हल्ल्यात नाहक आपला बळी गमवावा लागला होता, चंद्रपूरला कलंकीत करणाऱ्या या दुर्घटनेला चंद्रपूरकर अद्यापही विसरू शकले नाही. सुगंधित तंबाखूसंदर्भात झालेल्या कारवाईत प्राणघातक हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे, आत्तापासूनच यावर योग्य तो निर्बंध लावणे गरजेचे आहे. "खर्रा" विक्री करणारे या कुटूंबावर अन्य आपराधिक गुन्हे दाखल आहेत काय? व या घटनेमागे कुणी मोठा व्यावसायिक पाठीराखा आहे काय? याचा ही या निमीत्ताने पोलिस तपास व्हायला हवा.
चंद्रपूर शहर पोलिसांनी यासंदर्भात भादंविच्या 353, 332, 143, 147, 149, 188, 62 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी दिपक चालूरकर करीत असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध कलमांतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबतीत अधिक माहिती घेण्याच्या प्रयत्न केला असता अत्यंत परिश्रमानंतर ही सखोल माहिती मिळण्यास विलंब होत होता. याविषयी अन्नसुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहिते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणामुळे आपण फार थकलो असल्याचा मेसेज पाठविला व स्वत: येऊन माहिती संकलित करण्याचे सांगीतले.
सुगंधीत तंबाखूवर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार अन्न व प्रशासन विभागाला आहे. बल्लाळ नावाचे आयुक्त याठिकाणी कार्यरत असून त्यांच्याकडे ही अन्य ठिकाणचा कारभार देण्यात आला असून ते चंद्रपूरात प्रभारी असल्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर या जिल्ह्याच्या भार अपेक्षेपेक्षा जास्त आहे हे ही तेवढेच सत्य आहे. मोहिते नावाचे सहाय्यक आयुक्त आणि त्यांचे सोबत अन्य कर्मचारी वर्ग असा मोजका स्टाफ ही या कार्यालयाची दुरावस्था आहे. "दारू पिणारे दारू पिणार नाही तर बंदी असलेली दारू ज्यादा किंमतीत विकल्याचं जाणार नाही तसेच "खर्रा" खाणारे खर्रा खाणारचं नाहीत तर सुगंधित तंबाखूची तस्करी होणार कशी?" असा उलट प्रश्न करणारे अधिकारी चंद्रपुरात आहेत, यामुळेच तस्करी करणाऱ्यांची हिंमत बळावली, हे त्रिवार सत्य आहे. त्याचप्रमाणे दारू पिणारे अवैध दारू विकली जाते व "खर्रा" खाणारेचं महागडा "खर्रा" खाऊन अधिकारी झोपले आहेत कां अशा बोंबा मारतात? हे वास्तव आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांना कारवाई करतांना फार त्रास सहन करावा लागतो, तक्रारी करणारे पाठीमागे बोंबा मारतात, समोर यायला धजावत नाही, ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या जिल्ह्यातील सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

सुगंधी तंबाखूवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदी आहे. मागील अनेक वर्षापासून हा तंबाखू खुलेआम विकला जात आहे. अनेक पानटपरी व्यावसायिकांच्या कुटुंबाचा यावर उदरनिर्वाह आहे. महाराष्ट्रातील विदर्भामध्ये या सुगंधीत तंबाखूचा चुनामिश्रीत "खर्रा" विकल्या जातो. वरिष्ठ अधिकार्‍यांपासून तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून, हाथ ठेल्यावाल्यापासुन तर प्रतिष्ठित दुकानदारापर्यंत, नेत्यांपासून पत्रकारांपर्यंत "खर्रा" खाण्याचे चलन आहे. संचारबंदीपूर्वी बंदी असलेला हा तंबाखू मोठ्या प्रमाणात मोठ-मोठ्या व्यावसायिकांकडे बिनदिक्कत पुरवठा होत होता. मोठे रॅकेट याकामी लागले होते. राजकीय पुढाऱ्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत हा व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी "धनरूपी बिदागी" पोहोचविल्या जात होती. त्यांच्याच आशीर्वादाने या व्यवसायात अनेक "मन" सुख "लाल" झालेत. या व्यवसायात अग्रस्थानी कोण असे कुणालाही विचारलं तरी डोळे मिटून जी नावे समोर येतील, त्यांची माहिती सगळ्यांनाच आहे. संचारबंदीनंतर या मोठ्या व्यावसायिकांवर म्हणावी तशी कारवाई झाली हे त्रिवार सत्य आहे. संचारबंदीनंतर जिल्हा अंतर्गत वाहतुकीस बंदी असतांना जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू आला कुठून हा चिंतनाचा व संशोधनाचा विषय आहे तसाच अद्यापपावेतो किती मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई झाली हा ही तेवढाचं संशोधनाचा विषय ठरला आहे.
संचारबंदी नंतर छोट्यापासून-मोठ्यांपर्यंत आर्थिक संकट उद्भवले आहे. जिल्ह्यामध्ये आर्थिक संकटामुळे मागील काही दिवसांत आत्महत्याही झाल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांनी चुकीचा मार्ग न निवडतात स्वतःची जीवनलिला संपविण्याला प्राधान्य दिले, यानिमित्ताने या बाबींचा ही विचार व्हायला हवा.

पोलिस अधीक्षकांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे?
संचारबंदीनंतर पत्रकारांनी प्रत्येक वृत्त-अपराधिक बातम्या या फक्त फोनवर संकलित केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून पोलिसांची ऑनलाईन साईट ही बंद आहे. रोजच्या-रोज घडणाऱ्या आपराधिक घटना ह्या मर्जीतील काही मोजक्या पत्रकारांनाचं (?) पोलिस कर्मचाऱ्यांकडून दिल्या जातात, हा भेदभाव पोलिस अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालून दूर सारायला हवा, fir प्रत पत्रकारांचे WhatsApp क्रमांकावर पाठविण्यात यायला हव्या. याकडे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आवर्जुन लक्ष घालायला हवे.