हिंगणघाटचे माजी आ.राजु तिमांडेची दादागिरी!मद्यपीस सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाला मारहाण

हिंगणघाटचे माजी आ.राजु तिमांडेची दादागिरी! मद्यपीस सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाला मारहाण

चंद्रपूर प्रतिनिधी:-राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघटचे माजी आमदार राजू तिमांडे आणि त्यांच्या दोन मुलांना एका पोलीस शिपायास मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर आमदार तिमांडे यांची जामिनावर सुटकाही झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार तिमांडे हे त्यांच्या घरी गरजूंना शिधा वाटप करीत होते. याचवेळी एक मद्यपी तिथे आला त्याने गोंधळ सुरू केल्याने तिमांडे, त्यांचा नगरसेवक मुलगा सौरभ आणि गौरव तसेच काही कार्यकर्त्यांनी त्याला बदडून काढले.

या मारहाणीत बाजूच्या दुकानात असलेल्या गायकवाड नामक अल्लीपुरच्या पोलीस शिपायाने हस्तक्षेप केला. कर्तव्यावर नसलेल्या साध्या गणवेशातील शिपायाची ओळख न पटल्याने तिमांडे आणि अन्य व्यक्तींनी त्यालाही मारहाण केली.

पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्याने तिमांडे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना अटक झाली. दरम्यान, तिमांडे यांची जामिनावर सुटका झाली तर त्यांची दोन्ही मुलं अद्याप अटकेत आहेत.