लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षा निमित्‍त घोषित 100 कोटी रु. निधी त्‍वरित उपलब्‍ध करावा- आ. सुधीर मुनगंटीवार




लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍याकरीता 100 कोटी रु. निधी उपलब्‍ध करण्‍याचे सन 2019-20 चा अतिरिक्‍त अर्थसंकल्‍प विधिमंडळाला सादर करताना जाहीर करण्‍यात आले होते. मात्र अद्याप हा 100 कोटी रु. निधी उपलब्‍ध करण्‍यात आलेला नाही. सदर निधी त्‍वरित उपलब्‍ध करावा अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
या मागणी संदर्भात मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे, सामाजिक न्‍याय मंत्री धनंजय मुंडे यांना आ. मुनगंटीवार यांनी पत्रे पाठविली आहेत. आपल्‍या साहित्‍यातुन दीन, दुर्बल, शोषित, पिडीत, उपेक्षित, वंचितांच्‍या दुःखाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यासाठी 100 कोटी रु. निधी उपलब्‍ध करण्‍याचे अर्थसंकल्‍पात जाहीर करण्‍यात आले होते मात्र अद्याप हा निधी उपलब्‍ध झालेला नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित केले होते .अण्‍णाभाऊ साठे यांनी संयुक्‍त महाराष्‍ट्र चळवळ, गोवा मुक्‍ती संग्राम या चळवळीमध्‍ये शाहीरीच्‍या माध्‍यमातुन महत्‍वपुर्ण योगदान दिले आहे. स्‍वातंत्र्यपुर्व आणि स्‍वातंत्र्या नंतरच्‍या काळात राजकीय व सामाजिक प्रश्‍नांविषयी त्‍यांनी मोठी जागृती निर्माण केली. कष्‍टक-यांच्‍या प्रश्‍नांची सोडवणुक करण्‍याची त्‍यांनी आपले अवघे आयुष्‍य खर्ची घातले. त्‍यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षा निमित्‍त विविध कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षीत असताना व यासाठी निधीची घोषणा झाली असताना विद्यमान सरकारने हा निधी उपलब्‍ध करुन दिलेला नाही. ज्‍या मातंग समाजाचे प्रतिनिधीत्‍व अण्‍णाभाऊ साठे यांनी केले तो मातंग समाज आजही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या आघाडयांवर दुर्लक्षीत व मागास आहे. मातंग समाजाच्‍या विविध मागण्‍या शासन दरबारी प्रलंबित आहे. मातंग समाजाच्‍या मागण्‍यांची प्राधान्‍याने पुर्तता करत राज्‍य शासनाने लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षा निमित्‍त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यासाठी जो निधी घोषित केला आहे तो त्‍वरित उपलब्‍ध करावा व या थोर समाजसुधारकाला आदरांजली द्यावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.