ब्रेकिंग न्युज : बीडच्या केजमधून सव्वा दोन कोटींचे चंदन पोलिसांच्या हाती!




केज (प्रतिनिधी) - बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात चंदनाची चोरटी वाहतूक करणारा एक मोठा टेम्पो केज पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतला असुन, या टेम्पो मध्ये तब्बल 2 कोटी 18 लाख रुपये किंमतीचे सुमारे सव्वा टन चंदन जप्त करण्यात आले आहे. या टेम्पोच्या चालक वाहकाला पोलिसांनी अटक केली असून, हे चंदन बजरंग सोनवणे यांचे निकटवर्तीय व शरद पवार गटाचे नगरसेवक बालाजी जाधव यांचे असल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट झाले आहे.


बालाजी जाधव हा केज नगर पंचायतमध्ये नगरसेवक असून, तो बीड लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा निकटचा सहकारी आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील तो सक्रिय सहभागी असून, बजरंग सोवणने यांच्या घरी देखील जाधवची उठबस होती.


दरम्यान पोलिसांनी जप्त केलेले चंदन व टेम्पो सध्या केज पोलिसांच्या ताब्यात असून, सदर प्रकरणी वन अधिनियम व भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे. 

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी देखील केज पोलीस ठाण्यात जाऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत, योग्य त्या सूचना केल्या.

दरम्यान हे चंदन तस्करीसाठी कुठे नेले जात होते? काल सायंकाळ पर्यंत बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात व्यस्त असलेला बालाजी जाधव कुणाच्या मदतीने फरार झाला? बालाजी जाधवच्या पाठीशी कोण आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.


दुसरीकडे बालाजी जाधव बजरंग सोनवणे यांचा प्रचार करत सोवणने यांच्या सोबत फिरत असलेले अनेक फोटो व व्हीडिओ तसेच बजरंग सोनवणे यांच्या घरी व कुटुंबियांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


या सर्व घटनाक्रमावरून कोट्यवधी रुपयांच्या या चंदन तस्करीच्या मुळाशी कोण? या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार का? या तस्करी रॅकेटचा मास्टर माईंड बालाजी जाधव की त्याच्या डोक्यावर आणखी कोणाचा हात आहे? हे प्रकरण ऐन निवडणुकीत आणखी काय वळण घेईल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.