लोकसभा ५ आणि विधानसभा २५ जागा द्यावी,अन्यथा सर्व पर्याय खुले... आमदार जानकर
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ५ आणि विधानसभा निवडणुकीत २५ जागा द्याव्यात अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढवू किंवा आम्हाला सर्व दरवाजे खुले आहेत, त्यापूर्वी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी जनस्वराज्य यात्रेला सुरुवात केली असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी दिली.
याप्रसंगी आमदार जानकर म्हणाले की, आमचा पक्ष छोटा आहे. परंतु दुसऱ्याच्या जीवावर आम्ही किती दिवस राजकारण करणार. आम्हाला आमचा पक्ष वाढवावा लागेल, आमची औकात वाढवली तरच मोठे पक्ष आमची दखल घेतील. आपल्या चौकात आपली औकात असली पाहिजे, असे कार्यकत्यांना सांगून पक्ष उभारणीचे काम हाती घेतले आहे. राज्यातील बारामती,
माढा, सांगली आणि ईशान्य मुंबई या लोकसभेच्या पाच जागा भाजप ने आमच्यासाठी सोडाव्यात, अशी आमची मागणी आहे. मी स्वतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून लढणार आहे. असेही जानकर म्हणाले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचा शुभारंभ सोमवारी पंढरपूर येथील संत नामदेव महाराज समाधीपासून करण्यात आला. राज्यातील सर्व ४८ लोकसभा आणि देशभरातील ५४४ लोकसभा मतदारसंघात ही जनस्वराज्य यात्रा जाणार असून प्रत्येक तालुक्यात सभा घेण्यात येणार आहे. या जनस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने महादेव जानकर पंढरपुरात आले होते. संत नामदेव महाराज समाधी स्थळी यात्रेचा शुभारंभ केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जानकर यांनी भारतीय जनता पार्टीला इशारा दिला यावेळी रासपचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कुमार सुशील, रासपचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण लेंगरे, काशिनाथ शेवते, माऊली सलगर, सोमा आबा मोटे, अँड.संजय माने-पाटील,अजितकुमार पाटील, विद्यार्थी आघाडीचे प. महाराष्ट्र अध्यक्ष पंकज देवकते, सुनील बंडगर, अशोक दोणे, रणजित सुळ, अॅड. शरदचंद्र पांढरे, सुवर्णा जन्हाड-पाटील, महाळाप्पा खांडेकर, प्रा. संजय लवटे, दामाजी खरात आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थिती होते.