गोवर्धन मठ जगन्नाथपूरी येथील शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे मंगळवार 18 ऑक्टोबरला आगमन होत असून श्री जगन्नाथ धाम शकुंतला फार्म नागपूर रोड येथे भव्य विराट दिव्य धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.सनातन हिंदूधर्माच्या रक्षणासाठी हे अभियान असून शंकराचार्यान्च्या स्वागतार्थ विश्वाहिंदू परिषदसह इतर धर्मप्रेमी संस्था सज्ज झाल्या आहेत,अशी माहिती पत्रपरिषदेत स्वामी नारायणधामचे भगवताचार्य श्री मनिषभाई महाराज यांनी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी विश्वाहिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष रोडमल गेहलोत,दामोदर मंत्री,शैलेंद्र बागला,अजय जयस्वाल यांची उपस्थिती होती.
मनिष महाराज म्हणाले,जगतगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती 80 वर्षाचे असून त्यांनी सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 100 मुख्य शहराचा प्रवास केला आहे.मंगळवारी सकाळी 6 ते 7 वा.दरम्यान त्यांचे रेल्वेने आगमन होणार असून वेदमंत्रांचा उच्चाराने त्यांचे स्वागत केले जाणार आहे.दुपारी 4 ते सायं 7 वाजता शकुंतला फार्म्स येथे त्यांचे विशिष्ट मार्गदर्शन झाल्यावर 850 वर्ष जुन्या शिवलिंगाचे पूजन ते करतील.याचवेळी धर्मप्रेमींना 2500 वर्ष जुन्या पावन नारायण पादुकांचे दर्शन घेता येईल.काशी विश्वनाथ येथे अभिमंत्रित केलेले 5100 रुद्राक्ष महाप्रसाद म्हणून उपस्तितांना प्रदान केले जातील अशी माहिती त्यांनी दिली.
*विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग*
विराट दिव्य धर्म संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील 14 तालुक्यातून धर्मप्रेमींची मांदियाळी होणार असून यात विश्वाहिंदू परिषद,गायत्री परिवार,बजरंग दल व इतर संघटनांचा सहभाग राहणार आहे,अशी माहिती विहिपचे रोडमल गेहलोत यांनी दिली.
संस्कारांच्या सिंचनासाठी अभियान
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी 200 च्यावर ग्रंथ लिहिले.दररोज ते लिखाणकार्य करतात.हिंदुधर्मातील संस्कार आज लोप पावत आहेत.त्या संस्काराचे सिंचन व्हावे म्हणून हे राष्ट्रोत्कर्ष अभियान आहे,पुढील 3.5 वर्षात ते पुन्हा रुजवले जातील अशी माहिती भगवताचार्य मनीष महाराज यांनी दिली.