▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

अखेर रायुकाँ जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांना जामीन मंजुर
चंद्रपूर:- मागच्या काही कालावधीत वाघ, बिबट या वन्य प्राण्यांचा हल्यात दुर्गापूर, ऊर्जानगर, नेरी, कोंडी या परिसरातील तब्बल १३ सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला. या निषेधार्थ नितीन भटारकर यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३४, ३५३, ५०४, ५०६ व सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करा या मागणीकरिता वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी तब्बल ६ दिवस आमरण उपोषण केले होते. त्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर भटारकर यांनी उपोषण मागे घेतले परंतु उपोषणा वेळी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यानेच १३ वी दुर्दैवी घटना घडली असा भटारकर यांनी आरोप केला होता.

वनविभाग, सीटीपिएस व डब्ल्यू.सी.एल प्रशासनाला नितिन भटारकर यांनी वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केलं. वन विभागाला निवेदन दिल्यानंतर वन विभागाने सिटीपीस प्रशासन व डब्लू.सि.एल. प्रशासनाला त्यांच्या हद्दीतील परिसर असलेल्या ठिकाणांची तात्काळ साफसफाई करण्यासंदर्भात निर्देश दिले होते.

वन विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाने वाघ व बिबट करीता अनुकूल असलेल्या झाडझुडपांची साफ सफाई केली असल्यानेच या हिंस्र प्राण्यांनी ती जागा सोडली. त्याच प्रमाणे डब्ल्यू. सी. एल. ने सुद्धा त्यांच्या उपयोगात नसलेल्या जागेची साफसफाई करावी ही मागणी वारंवार केली होती. डब्लू.सी.एल. ने त्यांच्या जागेची साफसफाई केली असती तर कदाचित एका ८ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यु झाला नसता.

वनविभागाने सुचवलेल्या उपाययोजना व निर्देशाला घेऊन डब्लू.सी. एल. प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी दिनांक १२ मार्च २०२२ ला सुद्धा विभागीय व्यवस्थापक श्री. अरुण लाखे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. परंतु त्यानंतरही त्यांनी त्यांच्या जागेची साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वारंवार भेटून सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळेच डब्ल्यू.सी.एल. च्या जागेवर वाढलेल्या झुडपी जंगलामुळे एका निष्पाप प्रतीक बावणे या ८ वर्षाच्या मुलाचा तेरावा बळी गेला.

एवढ्या दुर्दैवी घटनेनंतर नितिन भटारकर यांनी व्यवस्थापकाला उपाययोजना करा अशी विनंती केल्यानंतर सुद्धा वारंवार संपर्क साधूनही अधिकार्यांतर्फे मुद्दाम शिष्टमंडळाला टाळण्याचा प्रकार केला.

त्याचमुळे या असंवेदनशील व सुस्त झालेल्या प्रशासनाला जाग करण्याकरिता नाईलाजास्तव नितीन भटारकर यांनी कायदा हाती घेऊन पूर्ण कार्यालयाची तोडफोड केल्यामुळे भटारकर यांचेवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३४, ३५३, ५०४, ५०६ व सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावर मा. जिल्हा सत्र न्यायालयाने आज नितीन भटारकर यांना अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.