नागभीड तालुक्यात खनिकर्म विभागाने केली रेती तस्करांवर धाडसी कारवाई !



चंद्रपूर (वि.प्रति.)
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या रेती तस्करी हा चर्चेचा आणि व्यवसायाचा विषय आहे. सद्य परिस्थितीत जिल्ह्यामध्ये कोणत्याही रेती घाटाला परवानगी देण्यात आली नाही. तरीसुद्धा अनेक रेती घाटावरुन, नदी-नाल्यांमधून रेतीचा उपसा खुलेआम होत आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी खनिकर्म विभागाने नाम. विजय वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात असलेल्या ब्रह्मपुरी येथील नदी घाटावरून नागभिड मार्गाने जाणाऱ्या तिन हायवावर धाडसी कारवाई केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेले हायवा व त्याचे मालक हे नागपूर जिल्ह्यातील असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेती तस्करी च्या मोठ्या रॅकेटमध्ये ते समाविष्ट असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते.

सविस्तर वृत्त असे की, ब्रम्हपुरी तालुक्यातील रेतीघाटातून रेती तस्करी सुरू असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारे खनीकर्म अधिकाऱ्यांनी धाड टाकून ३ हायवा ट्रक नागभिड तहसिल कार्यालयात जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मध्ये वाहन मालक अमोल भोंदे रा.दिघोरी नागपूर यांच्या मालकीचे mh 40 ax 8190, कृष्णा महाजन रा.उमरेड जि.नागपूर यांच्या मालकीचे mh 40ak7116,रणजित उईके यांच्या मालकीचे वाहन क्र.mh 36 aa 0112,या वाहनांना दोन दिवसांपूर्वी खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री कारवाई केली असून या सर्व वाहनांवर जप्तीनामा करून कार्यवाही करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती आहे.
कारवाई धाडशी कशी ?

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेती तस्करी ला राजकीय वरदहस्त प्राप्त आहे व अपराधिक प्रवृत्तींचा यामध्ये समावेश आहे हे सांगण्याची कुणालाही आवश्यकता नाही. चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाला रेती तस्करी होत आहे याची माहिती मिळाली. खनिकर्म अधिकारी नैताम साहेब यांच्या सोबत त्यांची टीम मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष स्थळी पोहोचले. त्या ठिकाणी तीन हायवा रस्त्यावर रेती भरून जातांना त्यांच्या निदर्शनास आले. पहिला हायवा क्रास होतानाच अधिकाऱ्यांनी ओव्हरटेक करू नये म्हणून त्यांचा मार्ग रोखण्यात आला. तरीसुद्धा कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांनी आपले कर्तव्य समजून तीन हायवा वर कारवाई केली. ही कारवाई करीत असतांना काही राजकीय पक्षाच्या लोकांनी त्याठिकाणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही केला परंतु त्याला न जुमानता खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई ही प्रशंसनीय आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, त्यात जीवाचा धोका हे सगळं करून अधिकारी कारवाई करतात, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्यानंतर ब्रह्मपुरी-नागभिड मार्गावर कारवाई करण्यात आलेले हे रेतीने भरलेले हायवा नागभीड तहसील कार्यालयात लावण्यात आले. या संपूर्ण कारवाईला कागदोपत्री स्वरूप देण्यामध्ये जवळपास तीन ते चार तास लागतात. तेवढा वेळ दिल्यानंतर ही दबावतंत्राचा वापर करून तिन नाही, तिस हायवामध्ये रेती ची होती, अशी अफवा प्रामाणिक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न हे गैरकृत्य प्रवृत्तीचे रेती तस्कर नेहमी करीत असतात. पालकमंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रातील रेती तस्करी हा नेहमीच चर्चेचा व बातमीचा विषय राहिला आहे. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र हे रेती तस्करांचे हब झाले असून त्यावर पालकमंत्र्यांनी आळा बसविण्यासाठी ठोस पाऊल उचलावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.