▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

वसतीगृहासाठी इमारत किरायाने देणेबाबत इमारत मालकांनी प्रस्ताव सादर करावेतचंद्रपूर दि. 3 नोव्हेंबर: विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुलांसाठी 18 व मुलींसाठी 18 असे एकूण 36 शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने सद्यस्थितीत जिल्ह्याच्या ठिकाणी मुला-मुलींसाठी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृहे भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू करण्यासाठी इमारत मालकांकडून इमारत किरायाने,भाड्याने देणेबाबत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. सदर इमारतीमध्ये 100 विद्यार्थ्यांकरीता निवासी खोल्या, संगणक कक्ष, ग्रंथालय, भोजन गृह, स्वयंपाक गृह , 10 ते 15 स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणात असणे आवश्यक असून मोकळी जागा असणे आवश्यक आहे.


तरी,वरील वर्णनाची इमारत भाड्याने द्यावयाची असल्यास त्यासंबंधीचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, शासकीय दुध डेअरी जवळ, जलनगर वॉर्ड चंद्रपुर येथील कार्यालयास दि. 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावेत किंवा कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.