मत्स्यपालन सहकारी संस्थांना मिळणार 50 टक्के अर्थसहाय्यचंद्रपूर दि. 29 नोव्हेंबर: मत्स्यव्यवसाय विभागातर्फे जिल्ह्यातील मत्स्यपालन सहकारी संस्थाच्या क्रियाशील मच्छीमारांना सूतजाळे, लाकडी नौका, डोंगा इत्यादी मासेमारीसाठी आवश्यक साधने खरेदी किमंतीवर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 50 टक्के अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.
याकरिता संबंधित लाभार्थी सभासद मत्स्यपालन सहकारी संस्थेचा क्रियाशील मच्छीमार असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये प्रत्येक क्रियाशील सभासद मच्छीमारास एका वर्षात जास्तीत जास्त 5 किलोग्राम सूतजाळे खरेदीवर अनुदान अनुज्ञेय आहे. या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील मत्स्यपालन सहकारी संस्थांनी आपल्या मच्छिमार सभासदांना अवगत करून त्यासंबंधीचे अर्थसहाय्य मागणी प्रस्ताव, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, चंद्रपूर तसेच मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, ब्रह्मपुरी या कार्यालयाशी संपर्क साधून तात्काळ सादर करावे.असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात येत आहे.