गावात फ़िरतांना ग्रामिण भाग असो की शहरी सार्वजनिक परिसरात पाहिजे त्याप्रमाणात आजही स्वच्छता राखली जात नाही. चौका चौकात विविधांगाने घाण पडलेली असते. एकीकडे स्वतःचे घर हे ज्याप्रमाणे स्वच्छ, सुंदर, राखण्याचा प्रयत्न करतात पण दुसरीकडे मात्र त्याच परिसरात राहणाऱ्या लोकांकडुनच सार्वजनिक परिसर नियमित घाण केल्या जात असतो, सुजाण असुन जाण नसल्यासारखे सार्वजनिक परिसराकडे बघितल्या जाते. दिवसांगनिक हा प्रकार वाढत असुन, सार्वजनिक परिसराच्या स्वच्छते पासुन प्रत्येक जन परावलंबाची भुमिका पार पाडतो. याकरिता आपल्या स्वतःच्या घराप्रमाणे सार्वजनिक परिसर ही स्वच्छ राहण्यासाठी परिसरातील प्रत्येकानी त्या मानसिकतेत बदल घडुन आणण्याची गरज आहे. त्याशिवाय सार्वजनिक परिसर हा नियमित शाश्वत स्वच्छ राहणार नाही.
सार्वजनिक परिसराची स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येकाने मनापासुन आपल्या मानसिकतेत बदल घडवुन आणण्याची गरज निर्माण झाली असुन, सार्वजिनिक परिसरात सांडपाणी, कचरा, प्लास्टिक, अशा विविधांगी नियमित घाण ही मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. याचा त्रासही त्या त्या परिसरातील लोकांना होत असतो. तरी पण याविषयी जागृत व्हायला, सर्व प्रथम हातात झाडु घ्यायला मात्र कोणी धजत नाही. जो पर्यंत सार्वजनिक परिसर विविध स्थळे यांच्याकडे स्वतःच्या घराप्रमाणे बघणार नाही किवा तसा दृष्टिकोन निर्माण होणार नाही त्याशिवाय एक एक सार्वजिनिक परिसर हा शाश्वत स्वच्छ होण्यास सुरवात होणार नाही. त्यासाठी सर्व जनमानसांचा सार्वजनिक परिसर स्थळाकडे बघण्याचा दृष्टिकोन व मानसिकता परिवर्तन घडवुन आणावी लागणार आहे.
स्वच्छ परिसर राहल्यास त्याचा फ़ायदा देखिल त्या त्या परिसरातील लोकांना प्रत्येक्ष अप्रत्येक्षपणे होत असतो.परिसर स्वच्छ, सुंदर, रमनिय राहल्यास परिसरातील राहणाऱ्या लोकांना फ़ेरफ़टाका मारता येतो, शुध्द आरोग्यदायी हवा ग्रहण करायला मिळेल, चारचौगांसोबत चौकात चर्चेमध्ये रममान होता येईल. फ़ावल्या वेळात विरुगुळा घेता येईल . यामुळे आपले आरोग्य सुध्दा चांगले राहिल. हे सर्व कळते पण आम्हाला वळत नाही. हिच मोठी खंत जाणवत आहे.ग्रामिण भागात सार्वजनिक परिसरात सांडपाणी निर्माण होवु नये यासाठी प्रत्येक घरी घर तेथे शौषखड्डा हि संकल्पना राबविल्यास, यामुळे प्रत्येक घरातुन निघणा-या सर्व प्रकारच्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्या जाईल. शौषखड्यामुळे त्याच परिसरात पाणी जमीनीत जिरवल्या जाईल . जर असे करता आले तर गावाती गटारी ह्या कोरड्या राखण्यास मदत होईल, उघड्यावर गावातील परिसरात सांडपाण्याचे डबके निर्माण होणार नाही व निर्माण होणाऱ्या डासाच्या उतपत्तीला आढा घालता येईल. याशिवाय शौषखड्ड्यात पाणी नियमित जिरवल्या गेल्यास गावाच्या परिसरातील भुगर्भाची पाण्याची पातळीत वाढ होण्यास मदत होईल. सार्वजनिक ठिकाणी साचणाऱ्या सांडपाण्याच्या त्रासा पासुन मुक्ती मिळेल.गावातील घनकच-याचा विचार केल्यास निघणा-या प्रत्येक घनकचऱ्याचे वैयक्तिक स्तरावर व्यवस्थापन केल्या गेल्यास घनकच-याच्या समस्येचे सुध्दा निराकरण केल्या जावु शकते.कपोष्ठ पिठ, नाडेप कुंडी, गांडुळ खत प्रकल्प, ईत्यादी बाबी द्वारा घनकच-याचे सुयोग्य पध्दतीने व्यवस्थापन करता येते. या कच-यापासुन दर्जेदार सेंद्रियखत निर्माण करुन, त्याचा शेतीला सुपिक करण्याकरीता व उत्पन्न वाढीकरिता चांगला वापर होतो.
पध्दती अनेक असतात गरज आहे चांगल्या गोष्टी सवयी सर्वप्रथम अंगवळणी उतरविण्याची. अस्वच्छता असलेल्या गावात लक्ष्मी वास करीत नाही . पण ज्या गावांनी स्वच्छतेचा वसा घेतलेला आहे. अशा गावात लक्ष्मी वास करते. व सुख समृध्दी आरोग्य व सुसंवाद पहायला मिळतो. नाही निर्मळ मन काय करिल साबण या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे कृती करावी लागणार आहे. यासाठी शालेय जिवनात स्वच्छतेची जागृती शाश्वतरीत्या नियमित होणे क्रमप्राप्त आहे. बालमनापासुन स्वच्छतेचे धडे गिरवल्यास तिच चाहुल त्यांच्या कडुन पुढिल पिढिला मिळेल व स्वच्छतेचे महत्व जनमानसात वाढायला लागेल. यातुन परिसराची शाश्वत स्वच्छता राखण्यास मदत होईल. शेवटी एकच सुचवावे वाटटे की आपण रस्त्यात थुंकतो किवा कचरा टाकतो. कारण तो आपल्या घराप्रमाणे आपण मानत नाही. त्यामुळे आपल्या घराप्रमाणे रस्ता, गाव, गावातील सार्वजनिक परिसराकडे बघण्याची मानसिकता आपल्या अंगवळणी असली पाहिजे.तेव्हाच सार्वजनिक परिसर हा शाश्वत स्वच्छ राखता येईल.
- कृष्णकान्त खानझोडे, चंद्रपुर .