सुगंधीत तंबाकु विक्रेत्यांवर कारवाई चे अधिकार पोलिस विभागाकडे देण्यात यावे,रासपचे निवेदन !




चंद्रपूर :- मागील अनेक वर्षापासून आरोग्यासाठी घातक असलेल्या सुगंधित तंबाखू वर महाराष्ट्रात बंदी आहे. बंदी असलेला हा सुगंधित तंबाखू विदर्भात मोठ्या प्रमाणात सर्रासपणे विकला जातो. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ सह अन्य जिल्ह्यांत या बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू चा करोडो रुपयांचा व्यापार सूरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या व्यवसायात सक्रीय असलेल्या व्यापाऱ्यांची मोठी साखळी उभी झाली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे सक्रीय असलेल्या वसीम झिंगरी या व्यापाऱ्यांवर पोलीस विभागाने कारवाई केली. या व्यवसायाचे धागेदोरे फार मोठ्या प्रमाणात गुंतले असून आरोग्यास हानिकारक व राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू वर कारवाई करण्याचे अधिकार राज्यात फक्त अन्न व प्रशासन विभागाला आहे, त्या विभागाने मदत मागीतल्यास पोलिस विभागाने मदत द्यावी, असा शासन निर्णय आहे.त्यामुळे सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई चे अधिकार पोलीस विभागाकडे देण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केले आहे.
अन्न व प्रशासन विभागाजवळ असलेला अपूर्ण कर्मचारी वर्ग, व या व्यवसायात पैशाच्या लालसेने प्रवेश केलेले असामाजिक व अपराधिक प्रवृत्ती यामुळे अन्न व प्रशासन विभाग या व्यवसायावर कारवाई करण्यात अक्षम असल्याचे दिसते. तरी बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू वर कारवाई चे संपूर्ण अधिकार पोलिस विभागाला देण्यात आल्यास सुगंधित तंबाखूच्या व्यवसायावर नक्कीच आळा बसू शकेल! त्यामुळे शासनाने सुगंधीत तंबाकु विक्रेत्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे यांचे सुत्र देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आली असून त्यांची राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार,लोकलेखा समितीचे अध्यक्ष आम.सुधिर मुनगंटीवार यांना देण्यात आली आहे.