चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील कु. वनश्री अशोक आंबटकर या १७ वर्षीय तरूणीचा एकतर्फी प्रेमातुन चाकुने वार होवून निर्घृण खुन करण्यात आला होता. याप्रकरणी मृतक वनश्रीच्या कुटूंबियांना सांत्वनापर भेट देताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. सदर आश्वासनाची पूर्तता झाली असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मृतक वनश्रीच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे.
दिनांक २२ ऑक्टोंबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली व मृतक वनश्रीच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करावे, अशी विनंती केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्वरीत उपसचिव सुदीन गायकवाड यांना कार्यवाहीच्या सुचना दिल्या व मुख्यमंत्री सचिवालयाने त्वरीत २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना २२ ऑक्टोंबर रोजीच पत्र पाठवून मृतक वनश्रीच्या कुटूंबियांना संबंधित अर्थसहाय्य प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मृतक वनश्रीच्या कुटूंबियांना २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मृतक वनश्री च्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आ .मुनगंटीवार त्यांच्या घरी भेट दिली असता नागरिकांनी बाबुपेठ परिसरात पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांच्याकड़े केली होती. आ. मुनगंटीवार यांनी पोलिस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांना सूचना देवून या परिसरात पोलिस चौकी देखील स्थापन करविली.