राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांना मातृशोक
सातारा :- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर (९५) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी पळसावडे येथे निधन झाले. काही महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांना मूळ गावी माण तालुक्यातील पळसावडे येथे आणण्यात आले होते. त्यांच्या पश्चात मुलगी रत्नाबाई विरकर वे ३ मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाचे वृत्त विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी आ. महादेव जानकर यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे फोनवरून सांत्वन केले. रात्री उशिरा गुणाबाई जानकर यांच्यावर पळसावडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.यावेळी कार्यकर्ते,व पदाधिकारी उपस्थित होते.
मेंढरे राखत, निसर्गाची भाषा शिकत जे कार्य केले त्याची गणती केली तर मोजमापही अपुरे पडेल. घोड्याच्या पाठीवर संसार लादून मेंढ्यांच्या कळपासोबत रानोमाळ भटकंती करणारे जानकर दांपत्य. भटकंती करणाऱ्या कुटुंबांचा मुक्काम निश्चित नसतो. आज इथं तर उद्या तिथं. अशा भटकणार्या कुटुंबात स्थिर राहून मुलांना उत्तम शालेय शिक्षण देणं किती जिकिरीचं असतं हे फक्त ते कुटुंबच जाणू शकते. कितीतरी डोंगरदऱ्या, कड्याकपारी, रानोमाळ भटकणारे स्व. जगन्नाथ जानकर व गुणाबाई जानकर या दांपत्याने हालअपेष्टा सहन करून मुलांना चांगले शिक्षण दिले. मुले शिकल्यानंतर जानकर दांपत्याला चांगले दिवस येतील असे वाटले होते परंतू या दाम्पत्याचा खडतर प्रवास संपला नाही. उच्चशिक्षीत मुलांना नोकरी करून ऐशोआरामात जगण्याची आस न बाळगता समाजसेवेसाठी मुलांना परवानगी देणारे व स्वत: कष्ट करत जीवन जगणाऱ्या जानकर दांपत्याने आजच्या घडीला भारतीय समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
दादा जानकर, सतीश जानकर, रत्नाबाई वीरकर, महादेव जानकर ही त्यांची मुले आहेत. सतीश जानकर यांना वकिलीचे शिक्षण दिले तर महादेव जानकर यांना अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. या दोन बंधूंनी अखंड अविवाहित राहण्याचे ठरवून यशवंत सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध जोरदार रान उठवले. २० वर्षांच्या संघर्षानंतर महादेव जानकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली त्या वेळी लाल दिव्याच्या गाडीत न बसता जमिनीवर बसणारी माता म्हणजे गुणाई जानकर. 'चांगलं काम कर नाही तर मारीन,' अशी आपल्या पुत्रास आज्ञा देणारी कणखर माणदेशी माता गुणाई जानकर.