चंद्रपूर, दि. 22 जानेवारी : कोरोना विषाणुवरील कोविशिल्ड ही लस पुर्णत: सुरक्षीत असून, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे लसीकरणामुळे इतर लाभार्थ्यांचे निश्चितच मनोधैर्य वाढेल असे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लसीकरण आढावा बैठकीत व्यक्त केले.
जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी काल कोविशिल्ड लस घेतली असून आज दि. 22 जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी संदिप गेडाम, यांचेसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलचे सदस्य मंगेश गुलवाडे, हृदयरोग तज्ञ डॉ. प्रविण पंत, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. अनिल माडुलवार, अस्थिरोग तज्ञ डॉ. वासुदेव गाडेघोणे हे देखील कोविशिल्ड लस घेणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील 16 हजार 524 कोरोना योद्धांना कोविशिल्ड लसीसाठी नोंदणी करण्यात आली असून प्राप्त लस साठ्यातून सध्या नऊ हजार आरोग्य सेवकांचे लसीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक 16 जानेवारी रोजी लसीकरणाला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. हे लसीकरण मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार असे प्रत्येक आठवड्यातून चार दिवस करण्यात येणार आहे. आतापर्यंत दिनांक 16, 19 व 20 जानेवारी रोजी तीन सत्रात झालेल्या लसीकरणात आरोग्य सेवेतील एकूण 1162 कोरोना योद्धांना लस देण्यात आली आहे.
बैठकीला महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.