सर्व ग्रामपंचायतींवर भाजपाच्‍या विचारांचा झेंडा फडकवा- आ. सुधीर मुनगंटीवार



कोरोनाच्‍या महामारीच्‍या काळात लॉकडाऊन दरम्‍यान भारतीय जनता पार्टी म्‍हणून नागरीकांनी आम्‍हाला हाक दिली तेव्‍हा त्‍यांच्‍या मागे आम्‍ही शक्‍ती उभी केली. पार्टी म्‍हणजे केवळ निवडणुकी जिंकण्‍याचे यंत्र नसुन मन जिंकण्‍याचे यंत्र होण्‍याची आवश्‍यकता आहे. सर्वसामान्‍य जनतेला आनंद देणारे व्‍यासपीठ होण्‍याची आवश्‍यकता आहे. येत्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत १५ ही ग्रामपंचायतींवर भाजपाच्‍या विचारांचा झेंडा फडकेल असा विश्‍वास माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.

दि. २६ डिसेंबर रोजी उर्जानगर परिसरातील अयप्‍पा मंदिरात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तालुका शाखेतर्फे कार्यकर्ता मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळाव्‍यात पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना संबोधतांना आ. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा नेते रामपाल सिंह, महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा अल्‍का आत्राम, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, जिल्‍हा परिषद सदस्‍या रोशनी खान, वनिता आसुटकर, विलास टेंभुर्णे, शांताराम चौखे, नामदेव आसुटकर, देवानंद थोरात, हनुमान काकडे, सुभाष गौरकार, संजय यादव, अतुल पोहाणे, चंद्रकांत धोडरे, लोकचंद कापगते, श्रीनिवास जंगम आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, ग्रामपंचायत निवडणुक जिंकणे हेच फक्‍त आपले ध्‍येय नसून सर्वसामान्‍य जनतेच्‍या जीवनातला अंधार दुर करुन प्रकाश निर्माण करणे हे आमचे ध्‍येय असण्‍याची आवश्‍यकता आहे. निवडणुकीचे योग्‍य नियोजन करुन प्रत्‍यक्ष अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. त्‍यामाध्‍यमातुनच निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुलभ होईल. भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन आपण या भागात केलेल्‍या विकासकामांची माहीती जनतेपर्यंत पोहोचविण्‍याची आवश्‍यकता आहे. कोणताही गाव ख-या समाजसेवकाच्‍या मागे ठामपणे उभा राहतो हा विचार कार्यकर्त्‍यांनी मनामनापर्यंत पोहोचवावा असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना केले. कोविडच्‍या जागतिक महामारीत ज्‍यांनी समाजाची सेवा केली, कोविड योध्‍दा म्‍हणून जीवाची पर्वा न करता काम केले त्‍यांचा गौरव करण्‍याचे कार्य केल्‍याबद्दल आ. मुनगंटीवारांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

मेळाव्‍याचे प्रास्‍ताविक भाजपा नेते रामपाल सिंह यांनी केले. या परिसरात आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अभुतपुर्व अशी विकासकामे झाली आहेत. ही आमची जमेची बाजु आहे. आ. मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात सर्व ग्रामपंचायती जिंकू असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. यावेळी आशिष देवतळे, अल्‍का आत्राम यांचीही भाषणे झाली.
या परिसरातील सुमारे ७० कार्यकर्त्‍यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. या नवप्रवेशीत कार्यकर्त्‍यांचे आ. मुनगंटीवार यांनी स्‍वागत केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्‍हा परिषद सदस्‍य गौतम निमगडे यांनी केले. कार्यक्रमाला भाजपा व पदाधिकारी यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.