ओबीसींची जातीनिहाय जनगणनेची मागणी राज्यसभेत करण्यात यावी !डॉ. मर्लावार
चंद्रपूर : ओबीसीत 400 पेक्षा जास्त जाती येत असुन ओबीसी समाज खुप मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहेत. ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहे मात्र ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचा विकास खुंटला आहे. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करुन समाजाला न्याय देण्यात यावा. ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी राज्यसभेत आवाज उठविण्याची मागणी धनगर समाज संघर्ष समीतीचे विभागीय अध्यक्ष डॉ तुषार मर्लावार यांनी राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्या कडे केली. यासोबतचं धनगर समाजाच्या रुपये एक हजार कोटींच्या मंजूर योजनांच्या अंमलबजावणी साठी त्वरीत निधिची तरतुद करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
नुकतेच शासकीय विश्रामगृहात धनगर समाज संघर्ष समीतीची विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. त्यात धनगर समाज संघर्ष समीतीचे अध्यक्ष तथा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, हरीश खुजे, उपाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, संजय कन्नावार, जिल्हाध्यक्ष संदीप शेळके,सचिव पवन ढवळे, कैलास उराडे,गजानन शेळके,भानेश येग्गेवार,प्नविण गिलबिले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ विकास महात्मे यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी राज्यसभेत आवाज उठविणार असुन वेळ आल्यास आपण रस्त्यावर उतरू अशी ग्वाही उपस्थित समाज बांधवांना दिली.