▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

मोदीजींची आत्‍मनिर्भर भारताची संकल्‍पना घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहचवा – आ. सुधीर मुनगंटीवारराष्‍ट्रपिता महात्‍मा गांधींनी या देशाला स्‍वातंत्र्याचा मंत्र दिला तर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आत्‍मनिर्भर भारताची संकल्‍पना मांडत देशाला आर्थिक स्‍वातंत्र्याचा मंत्र दिला. गांधीजींच्‍या स्‍वप्‍नातल्‍या भारताची कल्‍पना मोदीजींनी या देशासमोर मांडली. माजी पंतप्रधान लालबहादुर शासत्रीजींनी जय जवान जय किसान हा नारा दिला. भारतरत्‍न अटलजींनी या ना-याला जय विज्ञान अशी जोड दिली. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान याला जय अनुसंधान अशी जोड देत इन्‍व्‍हेंशन, इन्‍होवेशन वर भर दिला. हा देश इतरांवर अवलंबित न राहता आत्‍मनिर्भर व्‍हावा असा संकल्‍प करणा-या मोदीजींची ही संकल्‍पना घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहचविण्‍याचे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 2 ऑक्‍टोबर रोजी राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंतीचे औचित्‍य साधुन भाजपातर्फे आयोजित संवाद सेतुमध्‍ये आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, खा. अशोक नेते, आ. किर्तीकुमार भांगडीया, आ. देवराव होळी, आ. कृष्‍णा गजबे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे आदी भाजपा पदाधिका-यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, वंदनीय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तुझं गावं नाही का तिर्थ असे सांगत गावाचे महत्‍व विशद केले. महात्‍मा गांधीजींनी स्‍वदेशीचा मंत्र दिला. हाच स्‍वदेशीचा मंत्र नरेंद्र मोदी यांनी आत्‍मनिर्भर भारताच्‍या संकल्‍पनेच्‍या माध्‍यमातुन मांडला आहे. जगाच्‍या एकूण जीडीपी पैकी 25 टक्‍के जीडीपी एकेकाळी भारताचा होता. या देशातुन सोन्‍याचा धूर निघायचा असे म्‍हटले जायचे. इंग्रजांनी 150 वर्षे या देशावर राज्‍य करून आपल्‍याला मागे नेले. गेली 65 वर्षे कॉंग्रेसने या देशाचे नियोजन बिघडविले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करत आत्‍मनिर्भर भारत ही संकल्‍पना मांडली. त्‍यांनी प्रामुख्‍याने वोकल फॉर लोकल हे सुत्र सांगीतले. आपल्‍या देशात, राज्‍यात, आपल्‍या परिसरात वस्‍तुंचे उत्‍पादन व्‍हावे यावर त्‍यांनी भर दिला आहे. यात लगेच बदल जरी होणार नसेल तरीही ही प्रक्रिया मात्र सुरू झाली आहे. वस्‍तुंचे उत्‍पादन सर्वोत्‍कृष्‍ट ठरावे यासाठी झीरो डिफेक्‍ट, झीरो इफेक्‍ट, झीरो इम्‍पोर्ट, मॅक्‍झीमम एक्‍सपोर्ट असे सूत्र त्‍यांनी सांगीतले. जल, वायु, पर्यावरण यावर कोणताही परिणाम होणार नाही यादृष्‍टीने झीरो इफेक्‍ट, उतपादीत होणारी वस्‍तु दर्जेदार असावी म्‍हणून झीरो डिफेक्‍ट, आपल्‍याकडे आयात जास्‍त आहे निर्यात कमी आहे त्‍यामुळे निर्यात वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने झीरो इम्‍पोर्ट, मॅक्‍झीमम एक्‍सपोर्ट असे सूत्र मोदीजींनी मांडले आहे. ही संकल्‍पना मांडण्‍यापूर्वी मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया, ग्रीन इंडिया, स्‍टॅन्‍डअप, स्‍टार्टअप अशा अनेक योजना, उपक्रम त्‍यांनी सुरू केले. 20 लाख कोटी च्‍या आत्‍मनिर्भर भारत पॅकेजमध्‍ये मध्‍यम व लघु उद्योग अर्थात एमएसएमई साठी 3 लक्ष कोटी राखीव ठेवण्‍यात आले आहे. या माध्‍यमातुन लघु उद्योग, कुटीर उद्योग आदींनी चालना मिळेल. 1 लक्ष कोटी कृषी पायाभूत सुविधांसाठी राखीव ठेवले असून या माध्‍यमातुन कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. आपल्‍या दैनंदिन वापरातील अनेक वस्‍तु विदेशी कंपन्‍यांच्‍या माध्‍यमातून उत्‍पादीत होतात. त्‍याला सक्षम पर्याय हा आपल्‍या देशात वस्‍तुंचे उत्‍पादन होणे हाच असल्‍याचे या संकल्‍पनेचा मुळ उद्देश आहे. आपल्‍या देशात जॉब सिकर्स नव्‍हे तर जॉब क्रिएटर्स निर्माण व्‍हावेत हा उद्देश उराशी बाळगून पंतप्रधानांनी ही संकल्‍पना मांडल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्‍हयात ही संकल्‍पना पुढे नेण्‍यास मोठा वाव असल्‍याचे विशद करत आ. मुनगंटीवार म्‍हणाले, या दोन्‍ही जिल्‍हयात उद्योगांनी स्‍थानिक वस्‍तुंचा वापर करावा यासाठी मोठी संधी उपलब्‍ध आहे. वन, खनिज, पर्यटन, आरोग्‍य, तंत्रज्ञान, बांधकाम आदींवर आधारित उद्योग उभारण्‍याच्‍या दृष्‍टीने या दोन्‍ही जिल्‍हयात मोठा वाव आहे. यादृष्‍टीने आपण ही संकल्‍पना आपल्‍या दोन्‍ही जिल्‍हयात पुढे नेवू शकतो असेही पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना संबोधताना ते म्‍हणाले. चंद्रपूर जिल्‍हयात सैनिकी शाळा सुरू करताना या जिल्‍हयातील तरूण एअर चीफ, आर्मी चीफ, नौदल चीफ व्‍हावा व त्‍याने अभिमानाने म्‍हणावे की मी चंद्रपूरच्‍या सैनिक शाळेचा विद्यार्थी आहे हा भाव माझ्या मनात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या आत्‍मनिर्भर भारत या संकल्‍पनेवर हा संवाद सेतू कार्यक्रम असला तरीही हा संकल्‍पाचा सेतू व्‍हावा अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केली.
केंद्र सरकारने नुकतेच कृषी विधेयक दोन्‍ही सभागृहात पारीत केले. या कायद्यावरून जनतेमध्‍ये गैरसमज पसरविण्‍याचे काम कॉंग्रेसने सध्‍या सुरू केले आहे. वर्षानुवर्षे शेतक-यांना जोखडात बांधून ठेवण्‍यात आले होते. या कायद्याच्‍या माध्‍यमातुन शेतकरी या जोखडातुन मुक्‍त झाला आहे. आता मुक्‍तपणे शेतकरी कोठेही आपला माल विकू शकतो. या कायद्यामुळे कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांचे महत्‍व कमी होणार नसून ज्‍या शेतक-यांना बाजार समित्‍यांकडे जायचे असेल तर ते तेथेही जावू शकतात. मात्र शेतकरी कोणत्‍याही मध्‍यस्‍थाशिवाय आपला माल या कायद्याच्‍या माध्‍यमातुन विकू शकणार आहे. एमएसपीला सुध्‍दा या कायद्यामुळे कोणतीही अडचण नसून एमएसपी कंटीन्‍यु राहणार आहे. जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या कायद्यातुन शेतमालाला वगळल्‍यामुळे शेतकरी आपला माल निर्यात सुध्‍दा करू शकणार आहे. या कायद्याच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना नवे बळ मिळाले असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.