पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर स्‍मृती सभागृह रंजल्‍या गांजल्‍यांची सेवा करणारे सेवासदन ठरावे- आ. सुधीर मुनगंटीवारपुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या श्रेष्‍ठ स्‍मृती जपण्‍यासाठी त्‍यांच्‍या नावाने राज्‍यातील ६१ गावांमध्‍ये पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सभागृह बांधण्‍याची घोषणा मी अर्थमंत्री म्‍हणून २०१८-१९ अर्थसंकल्‍प सादर करताना केली होती. आज या ६१ सभागृहांपैकी पहिल्‍या सभागृहाचे लोकार्पण होत आहे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांनी आपल्‍या कर्तृत्‍वातून सेवेचा मंत्र दिला. हे सभागृह रंजले गांजले, दीनदुर्बल, विधवा, परित्‍यक्‍ता, घटस्‍फोटीता आदी दुर्बल घटकांची सेवा करण्‍याची भावना निर्माण करणारे सेवासदन, सेवा केंद्र व्‍हावे अशी अपेक्षा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.
दि. २५ ऑगस्‍ट रोजी अकोला जिल्‍हयातील बार्शीटाकळी तालुक्‍यातील पुनोती (बु) या गावातील पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सभागृहाच्‍या ऑनलाईन लोकार्पण सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या सभागृहाचे उद्घाटन आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जलसंपदा राज्‍यमंत्री ना. बच्‍चु कडू होते तर विशेष अतिथी म्‍हणून केंद्रीय राज्‍यमंत्री ना. संजय धोत्रे, राज्‍यसभा सदस्‍य पद्श्री डॉ. विकास महात्‍मे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, भाजपा-शिवसेना युती सरकारच्‍या काळात मी अर्थमंत्री असताना धनगर समाजाच्‍या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासासाठी १ हजार कोटी रु. निधी आम्‍ही उपलब्‍ध करुन दिला. या समाजातील तरुण विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात यावा, त्‍यांना योग्‍य संधी मिळावी, या समाजातील युवक मागे पडणार नाही हा त्‍या मागील मुख्‍य उद्देश होता. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ ६५ लक्ष रु. किंमतीची ६१ सभागृहे बांधण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला. या माध्‍यमातून लोकसेवेचा मंत्र देणा-या या लोकमातेच्‍या सेवाभावी स्‍मृती चिरकाल जपल्‍या जाव्‍या हा मुख्‍य उद्देश होता. महाराष्‍ट्रात जवळपास सर्व जिल्‍हयामंध्‍ये ही सभागृहे तयार होत आहेत. यातील पहिले सभागृह आज लोकर्पित होत आहे. जनसेवा हीच ईश्‍वरसेवा असल्‍याची भावना उराशी बाळगुन लोककल्‍याणाचा विचार करणा-या अहिल्‍यादेवींचा विचार प्रसारीत, प्रचारीत होत मनामनापर्यंत या सभागृहाच्‍या माध्‍यमातून पोहोचेल असा विश्‍वास आ. मुनगंटीवार यांनी बोलताना केला.
यावेळी आ. हरिश पिंपळे, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष महादेवराव काकड, सरपंच सौ. देवकन्‍या काळदाते, उपसरपंच डी.बी. वजाळे, सौ. सुमनताई गावंडे, चंद्रपूर भाजपा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.