दरवर्षी राज्यामध्ये मान्सूनपूर्व शेळ्यामेंढ्यासह मोठ्या जनावरांचे रोगप्रतिबंधक लसीकरण एप्रिल ते जून या कालावधीत केले जाते पण यावर्षी कोरोनाच्या संकटात मे महिन्याच्या मध्यावधी आला तरी अजूनही मान्सूनपूर्व जनावरांचे लसीकरण केले नसल्याने राज्यातील शेळ्यामेंढ्या सह सर्व जनावरांचे लसीकरण करावे अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार , पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
दरवर्षीप्रमाणे मान्सूनपूर्व लसीकरणाची कोणतीही प्रक्रिया पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली नाही मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर जनावरांमध्ये लाळ्या खुरकत,घटासर्फ, आंत्रविषार, फऱ्या, पी पी आर. या साथीच्या रोगांची लक्षणे दिसतात त्यामुळे या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीत वरील साथीच्या रोगांचे रोगप्रतिबंधक लसीकरण करतात पण यावर्षी केले नसल्याने मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर जनावरांमध्ये या साथीच्या रोगांचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर पशुधन मोठ्या संकटात सापडेल त्यामुळे राज्यातील पशुधनाचा व पशुपालक यांचा विचार करून याबाबत तातडीने निर्णय घेऊन जलद गतीने राज्यातील सर्व पशुधनाचे रोगप्रतिबंधक लसीकरण करणे गरजेचे आहे.
तसेच राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी अत्यल्प कार्यरत असल्याने सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी कोविड १९ (पी.पी. ई) किट्स उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून भविष्यातील मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या साथीच्या आजाराचा धोका ओळखून तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी ईमेलद्वारे केली आहे.