*डॉ.रितेश चंदेलवार लिखित*
===========================
मानवी देहात अपरिमित शक्ती असते, ती मानवी मनाच्या प्रत्येक कप्प्यामध्ये सामावलेली असते. मानवी मन उलगडणे सहज शक्य नसले तरी त्याच्या छटा जीवनभर विविध मार्गांने प्रतिबिंबीत होत असतात. त्या प्रत्येक मानवात मुलतः असतात, परंतु परिस्थितीनुरूप ध्येयाला अनुसरून व्यक्त होतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र विचार व आचार घेऊन जगत असतो. काही स्वार्थाने तर काही परोपकारी भावनेने जगणारी माणसं नेहमीच समाजात मिळतात. परंतु परोपकारी ध्येय्य उराशी बाळगून जीवनभर जगणाऱ्या काही व्यक्तीरेखा सदासर्वकाळ स्मरणात राहतात. त्यापैकीच ग्रामिण कृषी जीवनाशी निगडीत असे एक व्यक्तीमत्व की जे समाजाने जवळून अनुभवले आहे ते म्हणजे स्व. रामाजी लोंढे..!!
*जीवनकार्य*
स्व. रामाजी लोंढे यांचे जीवन अतिशय खडतर होते. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतूजी. वडिल चिंतूजी यांचा मृत्यू त्यांच्या लहानपणातच झाल्यामुळे जीवनाचा पुर्वाध अतिशय कष्टप्रद गेला.आई गंगुबाई एका संस्कारीत कुटुंबातील कनवाळू. त्यात विधवा आपल्या लहान लहान मुलांना सांभाळून कुटुंबाला संस्कारात आकार देण्याचा तीच्या मार्गदर्शनात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता. त्यांना डोमाजी नावाचे एक मोठे बंधू व गोदाबाई नावाची एक बहीण. 'पशूपालन' विशेषतः शेळ्या पालन हा मुख्य व्यवसाय असल्याने रानोमाळ भटकंती हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.सारं कुटूंब अशा काळात भटकंतीत व त्या व्यवसायात समर्पीत झालेलं.त्या व्यवसायाचा प्रचंड अनुभव व त्या अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन जीवनाचे मार्गक्रमन सुरू होते.परंतु हाच त्यांचा व्यवसाय त्यांच्या जीवनात कलाटणी देणारा ठरला. त्या काळातील चराई क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले.त्या समस्या जाणवू लागल्या.अशात आई गंगुबाईचं मार्गदर्शन यातून मुख्य व्यवसायाला पुरक व्यवसाय बनवायचा ठरवून त्यांनी या व्यवसायाच्या आधारे त्यांनी थोडी थोडी करून टप्प्या- टप्प्याने शेवटपर्यंत एकून ४५ एकर जमीन खरेदी केली.जोडधंदा म्हणून शेतीशी निगडीत कृषी थ्रेशर,आटा चक्की,विहिरीसह ओलीताच्या सोयी,त्यांनी टप्प्याटप्प्याने करून आर्थिक भरभराटीला चालना दिली.रामाजींचा परिवार तसा मोठा.त्यांनी शिक्षणाचं महत्व जाणले होते.शिक्षित नव्हते पण मात्र विचारानं आचरणानं सुशिक्षित मात्र नक्की होते.काळाची पावलं ओळखून आपल्या परिवारांचं मार्गक्रमण हे त्यांनी ओळखलं,व शिक्षणाला महत्व दिले. त्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वेळोवळी आर्थिक मदत याच व्यवसायातून झाली.परिवार शिक्षित तर झाला हे स्वप्न त्यांचं पुर्ण झालं.जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एक सुशिक्षित जबाबदार आदर्श पालक व उत्तम प्रयोशील शेतकरी म्हणून ते नावारुपास आले.
*रामाजी व त्रिवेणाईंचे वैवाहिक जीवन*
रामाजी यांच्या जीवनामध्ये त्रिवेणाईचा प्रवेश हा अतिशय महत्त्वाचा ठरला. त्यांचा विवाह वयाच्या १७ व्या वर्षी झाला. त्यावेळी त्रिवेणाईचे वय अवघे १३ वर्षाचे होते.त्रिवेणाई ही जवळच्याच बेलगाव येथील यमुनाबाई व डोमाजी तुराळे. एका सुखवस्तू कुटुंबातील मुलगी.विवाहानंतर सासू गंगूबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणाईच्या सहकार्याने रामाजींचा संसार फुलू लागला.वैवाहिक जीवनप्रवासात त्यांचा संसारात गणपत, कुंदा, मनोहर,बंडू,कालिंदा,पंडित व प्रभाकर अशी अपत्ये जन्माला आली. सर्वांच्याच शिक्षणासोबतच मोठ्या कुटुंबाचा खर्च या सर्व बाबी सांभाळत असताना कुटुंबात आर्थिक अडचणी वाढल्या असल्या तरी सर्वांच्या शिक्षणामध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही. पुढे सर्वप्रथम गणपतराव व नंतर मनोहर यांना काळानुरूप उपलब्द व्यवस्थेनूसार शिक्षण दिले,पुढे मोठ्या कुटूंबाचा भार व पशुपालन जोडधंदा सांभाळतांना त्यांना फार मोठी कसरत होत होती.त्या मुळे क्रमाक्रमाने मोठ्या दोन मुलांना त्यांनी आपल्या व्यवसायाला हातभार म्हणून काढले.पुढे शेती व आर्थिक व्यवहारात त्या मुलांची मोलाची मदत झाली.त्यात कुटुंबाची आर्थिक भरभराट होऊ लागली. उर्वरीत तीन्ही मुले बंडू,पंडित, प्रभाकर हे शिक्षण व्यवस्थेत तीन्ही स्तरावर आज शिक्षक प्राध्यापक/प्राचार्य म्हणून उच्च विद्याविभुषणासह उत्तम ज्ञानार्जनासह समाज प्रबोधनपर कार्य करित आहे.आणि हेच पाल्य त्यांची वेगळी ओळख तयार करित आहेत. म्हणून आज व तेव्हा हे कुटुंब एक अनेक पालकांना व विद्यार्थ्यांना एक आदर्श उदाहरण म्हणून ठरले होते व ते आज कायम स्थितीत आहे. ही रामाजींच्या दूरदृष्टीकोनाची व प्रगल्भ विचाराची प्रचिती आहे.
*मुलांचे शिक्षण*
सर्व मुलांचे प्राथमिक शिक्षण साधारणतः इतरांप्रमाणे गावातच पुर्ण करून आपल्या मोठ्या परिवाराला एक चांगली दिशा मिळण्यासाठी उर्वरित तीन्ही मुलांना शिक्षण देण्याची त्यांनी खुणगाठ बांधली.तेव्हा माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण केंद्रे मात्र गावापासून कोसो दूर.पण याही परिस्थीतीत तेव्हा परगावी शिक्षण द्यायचेच ही जीद्द.मुलांनी वडिलांची परिवाराच्या आर्थिक परिस्थीतीची ससेहोलपटीची कायम जाण ठेवत टेमुर्डा येथे माध्यमिक शिक्षण पुर्ण केले.रामाजी यांना त्यांच्या अपेक्षेतनूसार मुलांनी शिक्षणात उत्तम प्रगती वर्षानूवर्ष एकामागोमाग दाखविली.त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला.व पुढे एकामागोमाग आपल्या त्या मुलांना महाविद्यालयीन शिक्षण देण्यासाठी तालुक्याच्या ठीकाणी टाकले.त्या जवळपास १२ते १५ कि.मी.अंतर सायकलने कापून मुलांनी अकरावी पुर्ण केली मात्र प्रत्येकाला बारावी व त्यापुढील शिक्षणाला शहरी वातावरणात ठेऊन एक स्पर्धेच्या युगात रमण्याची व आव्हाणे पेलण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी भाड्याची खोली करून शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. घरमालकाला कधी पैशाच्या रुपात तर कधी आपल्या शेतीत पिकलेली वान देऊन त्याच्या मोबदल्यात ते किराया देत.वडीलांच्या आर्थिक ओढाताणीची जाणिव सदोदीत त्यांनी आपल्या पाल्यांना त्यांनी सातत्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करुन दिली. त्या आपल्या वडीलांना हातभार लावावा ही वृत्ती मुलांमध्ये बळावली व त्यातून मुले सुट्टीच्या दिवशी शेतीत राबावयाला अवश्य गावाला जात.शेतीची सर्व कामे ती करित.काहींनी तर अत्यल्प कालावधीत आटाचक्कीवर नोकरी,कारखाण्यात माजुरी,शेतीची सर्वच कामे करून वडिलांना आर्थिक मदतीत खारीचा वाटा उचलला.पुढे ती मुले तीन्ही स्तरावर शिक्षक म्हणून नोकरीत लागल्यानंतर तर त्यांच्या कुटुबाची विशेष आर्थिक भरभराट झाली.
*रामाजी लोंढे आणि शिक्षण विचार*
रामाजी लोंढे यांनी तशी कोणत्याही वर्गाची पायरी चढली नव्हती. परंतु गावातीलच पुरुषोत्तम ठाकरे यांच्या घरी चालणाऱ्या शिक्षणाच्या वर्गात त्यांनी काही काळ शिक्षण घेतले. सकाळी शिक्षण व दिवसभर शेळ्या चारायला जात होते. शेळ्या चारण्यासाठी रानात गेल्यावर रानातील भाराटीच्या (जाड पानाची काटेरी झुडपी वनस्पती)पानावर काट्याने अक्षरे गिरवून अक्षरांचा सराव केल्याचे ते नेहमी मुलांना सांगत होते. एवढ्या शिक्षणामुळे त्यांना मराठी अक्षर ओळख होती. स्वाक्षरी करता येण्या इतपत शिक्षण घेतले असले तरी त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळून चुकले होते. ग्रंथ,पुस्तके अस्खलितपणे वाचत होते.त्यामुळेच त्यांना शिक्षणाचे महत्व पटले. पाचही मुलांचे प्राथमिक शिक्षण गावातच पुर्ण करून आपल्या मोठ्या परिवाराला एक चांगली दिशा मिळण्यासाठी उर्वरित तीन्ही मुलांना शिक्षण देण्याची त्यांनी खुणगाठ बांधली.तेव्हा माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण केंद्रे मात्र गावापासून कोसो दूर.पण याही परिस्थीतीत तेव्हा परगावी शिक्षण द्यायचेच ही जीद्द. मुलांनी वडिलांची परिवाराच्या आर्थिक परिस्थीतीची व त्यासाठी होत असलेल्या ससेहोलपटीची कायम जाण ठेवत ९ मैलावरील टेमुर्डा येथे माध्यमिक शिक्षण पुर्ण केले.रामाजी यांना त्यांच्या अपेक्षेनूसार मुलांनी शिक्षणात वर्षानूवर्ष उत्तम प्रगती एकामागोमाग दाखविली.त्यामुळे त्यांचा हुरूप व विश्वास पर्यायाने वाढला.व पुढे एकामागोमाग आपल्या त्या मुलांना महाविद्यालयीन शिक्षण देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी टाकले.तालूका स्वगावापासून जवळपास १२ ते १५ कि.मी.अंतर सायकलने कापून मुलांनी अकरावी पुर्ण केली मात्र प्रत्येकाला बारावी व त्यापुढील शिक्षणाला शहरी वातावरणात ठेऊन एक स्पर्धेच्या युगात रमण्याची व नवी आव्हाणे पेलण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी कठिण आर्थिक परिस्थितीत सुद्धा भाड्याची खोली करून शिक्षणाची सोय उपलब्द करून दिली.घरमालकाला कधी पैशाच्या रुपात तर कधी आपल्या शेतीत पिकलेली वान देऊन त्याच्या मोबदल्यात ते किराया देत.वडीलांच्या आर्थिक ओढाताणीची जाणिव सदोदीत त्यांनी आपल्या पाल्यांना त्यांनी सातत्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करुन दिली.आपल्या वडिलांना कामात हातभार लावावा ही वृत्ती मुलांत बळावली व त्यातून मुले सुट्टीच्या दिवशी शेतीत राबावयाला अवश्य गावाला जात.काहींनी तर सुट्याकाळात तर शिक्षण कालावधीत आटाचक्कीवर नोकरी,कारखाण्यात मजुरी,शेतीची सर्वच कामे करून वडीलाला आर्थिक मदतीत खारीचा वाटा उचलला.पुढे ती शिक्षक म्हणून नोकरीत लागल्यानंतर तर त्यांच्या कुटुबाची विशेष आर्थिक भरभराट झाली.
त्यांनी आपल्या सर्वच मुला मुलींना शिक्षण दिले. प्रत्येकाला शिक्षण घेण्यासाठी बाध्य केले. परिणामतः पुढे त्यांच्या घराची ओळख सुशिक्षित घर म्हणून समाजात निर्माण झाली. त्यांच्या दोन मुली व पाच मुले यामध्ये सर्वच माध्यमिक शिक्षण ते पदवी, पदव्युत्तर एवढेच नाही तर आचार्य(पीएच.डी.) पर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. केवळ अक्षर ओळख असलेल्या व्यक्तीच्या कुटूंबात अशा प्रकारचे शैक्षणिक वातावरणात निर्माण होणे त्या काळात एक आदर्श प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर त्यांनी ठेवले.याचे श्रेय श्री रामाजी लोंढे व त्यांच्या अर्धांगिनी त्रिवेणाईच्या दूरदृष्टीकोनालाच द्यावे लागते..
*रामाजी लोंढे व आध्यात्म*
रामाजी लोंढे यांना आध्यात्माची विशेष आवड होती. मानवी जीवनाचं सार्थक स्वतः आध्यात्मिक ज्ञानातून साधता येतं या गुरूप्रसादातून ओढ निर्माण झाली.त्यामुळे तुकारामाची गाथा, दासबोध, ज्ञानेश्वरी,ग्रामगीता,सटिक पंचिकरण,भजने,कथासार,भारूडे यामधील अभंग त्यांना मुखोद्गत होते. प्रत्तेक शब्दाला आपल्या आध्यात्मिक विचारकक्षेत बसवून जीवनाचं मुळ स्वरूप व दिशा ते ओळखून महत्व देत असे.त्यांचे आध्यात्मिक ज्ञान व त्यांचा परस्पर वार्तालाप हा वैचारीक व व्यवसायीक प्रचारकांसोबत चांगली जुगलबंदी होत असे.असं देह व देहातीत ज्ञान त्यांना अवगत झालं होतं.नव्हे तर त्यांनी केलं होतं. अशा अभंगाचा अर्थ व त्याचा जीवनातील अनुभवाशी सांगड घालून अभंगांचे स्पष्टीकरण ते सहजपणे करित होते.भजन हे केवळ चालीवर गायक म्हणून न गाता त्यातील प्रत्तेक शब्दाला अर्थ व त्यातील ओळीचा अर्थ संदर्भ ते सहजपणे ग्रांथिक भाषेतून सहज समजून देत आणि वास्तव मानवी जीवनाला त्यात ते बसवित असे.व तेवढ्याच प्रगल्भतेने समजावून सांगत असे. किर्तन हा प्रकार त्यांच्या सर्वात आवडीचा.जिथे कुठे किर्तन आहे असे माहित झाल्यास ते ऐकण्यासाठी आपल्या समविचारी गुरूबंधूंसोबत जाऊन आस्वाद घेत असे.दुस-या दिवशी त्या महाराजांसोबतच्या चर्चेचा खल चांगला रमवित असे.
त्यामुळे त्यांचा जडवादाच्या आध्यात्मिक विचारसरणीच्या लोकांवर मोठा प्रभाव होता. गावातील महादेवराव पांगुळ व हरिभाऊ बुरडकर हे त्यांचे वैचारिक जिवलग मित्र होते. या तिघांच्या प्रभावामुळे गावातील अनेक तरुण आध्यात्मिक विचारांकडे आकृष्ट झाले होते. वैचारिक आदानप्रदान तसेच आध्यात्मिक ग्रंथांच्या विचारमंथनासाठी सामूहिक वाचन दर दिवशी महादेवराव पांगुळ यांच्या घरी संध्याकाळी आठ ते दहा या काळात सर्व एकत्र होत होते. त्यांच्या सत्संगाचा परीणाम म्हणून भानुदास फुलभोगे, रमेश चिकटे, चंद्रभानजी काकडे, मारोती तुराळे, हे त्यांच्या आध्यात्मिक वर्तुळात सामील झाले. परंतु रामाजी लोंढे यांच्या मृत्यूमुळे कोंढाळा गावातील सत्संग व दैनिक विचारमंथन कार्यक्रम मात्र बंद झाला.
*रामाजी लोंढे व पंढरपुरचा विठोबा.*
रामाजी लोंढे यांचा कर्मकांडावर विश्वास नव्हता,प्रखर विरोध होता.नवस,कोबडे बकरे बळी देणे,मंतर जंतर,जादूटोना,पुजापाठ,भटशाही पुजा याला ते मानत नव्हते. ते केवळ आपल्या कुटुंबात मानसिक संतुलन राहावे यासाठी प्रासंगिक ते करतांना अनुभवले. हे सर्व असले नसले तरी त्यांची पंढरपूरच्या विठ्ठलावर अपार श्रद्धा होती.हे विषेश. ह्याचे कारणही तेवढेच महत्वाचे. संत साहित्यात विठ्ठलरुपाला संदर्भित धरून लिहिलेंलं साहित्य त्यांना विठ्ठलापासून दूर सारू पहात नव्हतं.विठ्ठलरूपाला निर्जिव पाषाणी न समजता स्वतःला त्यात अनुभवायचा अनुभव घेण्यासाठी ते अधुन मधून आषाढी-कार्तिकीची वारी त्यांना जीव की प्राण वाटत होती. पंढरपूरचा विठोबा मुळात पशुपालक, कष्टकऱ्यांचे दैवत असल्यामुळे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने हा त्यांचा विठ्ठलाप्रती भक्तिभाव अप्रतिम होता. शेतीच्या कामातून वेळात वेळ काढून ते विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते परंतु शेतीचा व कुटुंबाचा व्याप यामुळे त्यांना दरवर्षी वारी करणे सहज शक्य होत नव्हते. तरी ते अनेकदा पंढरपूरच्या वारीला जात असे.संतवाडःमयाला आपल्या विवेकी शक्तीने मानवी देहाच्या पलिकडील अखिल ब्रम्हांडाच्यापलिकडे एक चिरंतन शक्ती आहे की जी या विश्वाचे चलनवलन करते. या संतांच्या अंत्य विचाराच्या शोधात व अनुभवात आपले विचार सदैव ते आणत होते.ज्ञानेश्वरी,दासबोध,गाथा यातील संदर्भ अनेकदा ते विचार प्रगट करतांना देत असे.अशी त्यांची दृढ समज ही संत वाडःमयाला प्रमाण ठरवित होती हे मात्र नक्की .
अशा या विवेकी, न्यायप्रविण, समाजउद्धारक, विज्ञाननिष्ठ, कर्तृत्ववान, आदर्श पिता, समाजशिल वैद्य, द्रष्ट्या व्यक्तीमत्वाविषयी अनेक पैलू मांडता आले जे समाजातील इतर बांधवांना ते नक्कीच प्रेरणादायी असतील यात शंका नाही. त्यांच्या अनेक स्मृती सोबत ठेऊन मार्गक्रमण करीत असलेले त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या त्याकाळी संपर्कात असलेला त्यांचा मित्रपरिवार, आप्तेष्ठ, शेतकरी बांधव माता भगिणी त्यांच्या अनेक पैलूला आजही अलगत स्पर्श करतात. त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.
डॉ. रितेश चंदेलवार
रावेर-जळगाव