क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे जिवनचरीत्र भारतीयांसाठी प्रेरणादायी-आ.सुधिर मुनगंटीवार

क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांचे जीवनचचरित्र प्रत्‍येक भारतीयासाठी दीपस्‍तंभागत प्रेरणादायी – आ. सुधीर मुनगंटीवार

महाराष्‍ट्र प्रदेश भाजपातर्फे क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांना फेसबुक लाईव्‍हच्‍या माध्‍यमातुन आदरांजली
विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्‍त गेले, वित्‍तविना शुद्र गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले* अशा शब्‍दात विद्येचे, शिक्षणाचे महत्‍व अधोरेखित करणारे क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले तसेच ज्‍योतीबा फुले यांच्‍या खंबीर सोबतीने स्‍त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले यांनी जो संघर्ष केला तो अभूतपूर्व आहे. साक्षर झालेला समाज व शिक्षीत झालेली स्‍त्री हे केवळ महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या परिश्रमाचे फलीत आहे. त्‍यांचे जीवनचरित्र प्रत्‍येक भारतीयासाठी दीपस्‍तंभागत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आज महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या जयंतीनिमीत्‍त महाराष्‍ट्र प्रदेश भाजपातर्फे त्‍यांना फेसबुक लाईव्‍हच्‍या माध्‍यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आदरांजली व्‍यक्‍त केली. यावेळी माजी मुख्‍यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते एकनाथराव खडसे, माजी मंत्री गिरीष महाजन, विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी भाजपा पदाधिका-यांची उपस्थिती होती. प्रास्‍ताविक चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकताना *क्रांतीचा सुर्य तू, स्‍वाभीमानाचे पर्व तू* या ओळींनी आ. मुनगंटीवार यांनी भाषणाला प्रारंभ केला. समाजातील अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातीभेद पाहून अस्‍वस्‍थ होणारे ज्‍योतिबा फुले यांनी पुण्‍यातील भिडेवाडयात 1848 मध्‍ये फक्‍त स्‍त्रीयांसाठी स्‍वतंत्रपणे शाळा काढली. पहिली महिला शिक्षीका आणि मुख्‍याध्‍यापिका बनण्‍याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला. क्रांतीज्‍योती सावित्रीबाई यांनी महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या सोबतीने स्‍त्री शिक्षणाचा पाया रचला व त्‍यासाठी अभूतपूर्व असा संघर्ष केला. भारतरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरूस्‍थानी मानायचे. 1883 मध्‍ये शेतक-यांचा आसुड या पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातुन समाजातील विषमतेवर त्‍यांनी प्रहार केला. 1882 साली हंटर कमीशनसमोर साक्ष्‍य देताना 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्‍तीचे केले पाहीजे व शिक्षण मोफत दिले पाहीजे अशी मागणी करत शील संवर्धन, सत्‍यनिष्‍ठा, नितीमत्‍ता व व्‍यवहार ज्ञान यावर शिक्षणात भर दिला पाहीजे अशी भूमीका त्‍यांनी मांडली. 1888 साली ज्‍योतिबा फुले यांना अर्धांगवायुचा झटका आला आणि उजवी बाजू काम करेनाशी झाली. 1 एप्रिल 1889 रोजी त्‍यांनी सार्वजनिक सत्‍यधर्म हा ग्रंथ डाव्‍या हाताने लिहून पूर्ण केला. 23 सप्‍टेंबर 1873 रोजी त्‍यांनी सत्‍यशोधक समाजाची स्‍थापना केली. सामाजि‍क विषमता नष्‍ट करणे, शेतक-यांना हक्‍काची जाणीव करून देणे यावर त्‍यांनी कायम भर दिला. भारतीय ग्रामोद्योग आणि कुटीर उद्योग साम्राज्‍यशाहीच्‍या आर्थीक धोरणांमुळे कसे ढासळले याचे हृदयविदायक वर्णन त्‍यांनी आपल्‍या साहित्‍यातून केले. शिक्षणाचे महत्‍व पटवून देण्‍यासाठी त्‍यांनी अवघे आयुष्‍य खर्ची घातले. त्‍यांच्‍याविषयी गौरवपर उदगार काढताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी निरक्षरता और निर्धनता का बडा गहरा संबंध है असे सांगत ज्‍योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्‍व पटवून देण्‍यासाठी आजन्‍म केलेला संघर्ष भारतवर्षासाठी प्रेरणादायी असल्‍याचे म्‍हटले आहे, असेही आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले. आपल्‍या 15 मिनीटाच्‍या भाषणात महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांचे कर्तृत्‍व सांगताना त्‍यांच्‍या जीवनाचे अनेक पैलु त्‍यांनी मांडले.
महात्‍मा ज्‍योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना माझ्यापरिने लोकप्रतिनिधी म्‍हणून आदरांजली वाहण्‍यासाठी विधानसभेच्‍या माध्‍यमातुन मी प्रयत्‍न करू शकलो याचा मला आनंद आहे असे सांगताना ते म्‍हणाले, महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या वंशजांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी मी विधानसभेच्‍या माध्‍यमातुन केलेला संघर्ष फळाला आला. त्‍यांच्‍या वंशजांना शासकीय सेवेची संधी मिळाली. पुणे विद्यापीठाला क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांचे नांव देण्‍याची मागणी पूर्ण करण्‍यासाठी संसदीय आयुधांच्‍या माध्‍यमातुन मी शासनाला भाग पाडू शकलो. पुण्‍यातील भिडेवाडयाची दुरूस्‍ती व नुतनीकरण करण्‍यासाठी मी विधानसभेच्‍या माध्‍यमातुन प्रयत्‍न केले, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
*‘क्रांतीसुर्या, तुमच्‍या दिव्‍य प्रकाशाने, जीवन आमचे उजळले, ज्‍योतीबा तुमचया कर्तृत्‍वाने, जनसामान्‍य उध्‍दरले’* या ओळींनी त्‍यांनी आपल्‍या भाषणाची सांगता केली.