कोरोनातही ग्रामीण जनता डीजीपे कडे वळली!सेतू व पोस्टातून १०दिवसात ३९,लाख रूपये काढले!

कोरोनातही ग्रामीण जनता डीजीपे कडे वळली!सेतू व पोस्टातून १०दिवसात ३९,लाख रूपये काढले!


चंद्रपूर, दि. 16 एप्रिल : कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण जनतेने देखील मोठ्या प्रमाणात गावागावातील सेतू केंद्रातून व पोस्ट ऑफिस मधून डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर केला आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसात बँकेशिवाय केवळ आधार कार्डवर ग्रामीण भागातील जनतेने 39 लक्ष रुपयांचा व्यवहार केला आहे.

जिल्ह्यातील मुख्य पोस्ट कार्यालय तथा कॉमन सर्विस सेंटर अर्थात आपले सेवा केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण भागातील जनतेने आधार कार्ड लिंक असणाऱ्या विविध योजनांचा या काळात मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याचे पुढे आले आहे.

सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना आदी विविध योजनांसाठी लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. याशिवाय केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना, गॅस सबसिडी, मारत व इतर बांधकाम योजना संदर्भातील रक्कम या काळात जमा केली आहे.

या योजनांचे लाभार्थी जेष्ठ नागरिक, कामगार मजूर, मुख्यत्वे गरीब व अल्प मिळकत गटातील नागरिक आहेत. रोजच्या कमाईवर जीवन असल्यामुळे अनेकांचे पैसे या खात्यांमध्येच जमा असतात. संचारबंदी लागल्यामुळे रोजचा रोजगार बंद. आवक नाही.तालुक्याच्या बँकेमध्ये जाऊन पैसे काढणे शक्य नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने या काळात आपले सरकार सेवा केंद्र अर्थात सेतू केंद्र खुले ठेवून नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात आधार कार्ड दाखवून आवश्यक पैसे देण्याचे जाहीर केले. चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्देश दिल्यामुळे संचार बंदीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घरपोच पैसे पोहोचण्यास मदत झाली. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करणे, प्राथमिक गरजा भागविणे व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे यासाठी लागणारा पैसा गावातच मिळाला.

गावात नगदी पैसा उपलब्ध करून देण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे.आधार कार्ड दाखविल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेतल्या जातो. त्या व्यक्तीला आवश्यक असणारा पैसा सेतु केंद्रातील कर्मचारी ऑनलाइन तपासून घेतो. त्याला गरज असणारे पैसे तात्पुरत्या स्वरूपात या केंद्राच्या कर्मचाऱ्याकडे नगदी उपलब्ध असलेल्या रोकड रकमेतून दिल्या जाते.

कॉमन सर्विस सेंटरचे जिल्हा प्रबंधक रमजान शेख यांनी गेल्या 15 दिवसात ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या खात्यातून पैसे काढल्याचे सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केवळ 10दिवसांच्या अवधीत 25 लाख रुपये खात्यातून काढण्यात आले. तर मुख्य पोस्ट कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल पासून जिल्हाभरातील 335 पोस्ट ऑफिस मधून 14 लाख रुपये नागरिकांनी काढल्याचे पुढे आले आहे.एकत्रित ही रक्कम बँकेत वाढलेली गर्दी आणि संचार बंदीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास बघता सेतूमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना घरपोच सेवा देखील दिली आहे.