उद्या रवाना होणार अयोध्येला विदर्भातील काष्ठ



चंद्रपूर,दि.28 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सागवन काष्ठ प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येला उद्या (बुधवार) रवाना होणार आहे. रामायणात ज्या दंडकारण्याचा उल्लेख आहे त्या दंडकारण्याचा भाग असलेल्या चंद्रपूरमधील सागवन काष्ठ अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी वापरले जाणार आहे. हे काष्ठ पाठविण्याचा आनंदोत्सव चंद्रपूर आणि बल्लारशामध्ये उद्या बुधवारी साजरा होणार आहे, अशी माहिती राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या काष्ठपूजन सोहळ्याला श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोष्याध्यक्ष आचार्य गोविंददेव गीरी महाराज,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.योगेंद्र उपाध्याय स्टॅम्प, न्यायालय शुल्क राज्यमंत्री श्री रविंद्र जायस्वाल वन, पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ अरुणकुमारजी सक्सेना अभिनेते अरुण गोवील,सुनील लहरी,अभिनेत्री दिपीका चिखलिया या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
काष्ठपुजन, शोभायात्रा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास दोन हजार कलावंत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, असेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दुपारी ३.३० वाजता बल्लारपूर एफडीसीएम डेपोमध्ये काष्ठपुजन होईल. त्यानंतर चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिरापासून प्रभू श्रीरामाच्या मंदिरापर्यंत शोभायात्रेचे आयोजन होईल. रात्री ९.३० च्या सुमारास चांदा क्लब ग्राऊंड शोभायात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी रात्री ९.३० वाजता सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा रामधून व राम भजनाचा कार्यक्रम होईल.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चंद्रपूर शहर आणि बल्लारपूर शहर सज्ज झाले असून, ठिकठिकाणी होणाऱ्या शोभयात्रेसाठी स्वागतकमानी,पताका,भगवे झेंडे लावण्यात आले असून मार्गावर रामधून सुरू असून वातावरण राममय झाले आहे. आयोजनासाठी शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने या परिश्रम घेत आहेत.
तिरुपती मंदिराने पाठविला प्रसाद : तिरूपती येथील बालाजी मंदिराने १५ हजार मंदिरांचे प्रसाद लाडू भाविकांसाठी पाठविले आहेत. तिरुपती देवस्थानाला आपण सागवन काष्ठ अयोध्येच्या राम मंदिर निर्माणासाठी पाठवत असल्याचे कळविले होते. त्यानंतर त्यांनी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसाद पाठवित असल्याचे सांगितले, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.
स्वप्नपूर्तीचा क्षण : श्रीरामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांच्या मातोश्री इंदूमती या विदर्भाच्या. त्यामुळे आजीच्या भूमीतून नातवाच्या मंदिर निर्माणासाठी सागवन काष्ठ जात असल्याचा हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.