मूल शहरातील आठवडी बाजार व भाजी मार्केटसाठी उर्वरीत 4 कोटींचा निधी वितरीत



चंद्रपूर,दि. 20 सप्टेंबर : मूल नगर परिषद क्षेत्रातील आठवडी बाजार व भाजी मार्केटचे बांधकाम करण्‍यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापैकी 7 कोटी रू. निधी खर्च करण्यास            23 मे 2017 च्‍या नगरविकास विभागाच्‍या पत्रान्‍वये मान्‍यता देण्‍यात आलेली होती. तर आता उर्वरीत  4 कोटी रू. निधी वितरीत करण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे. शासनाच्‍या नगरविकास विभागाने 19 सप्‍टेंबर 2022 रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. वने व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर मूल शहरातील आठवडी बाजार व भाजी मार्केटच्‍या बांधकामाला या निधीच्‍या माध्‍यमातून गती प्राप्‍त होणार आहे.

श्री. मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात दिनांक 17 नोव्‍हेंबर 2017 रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये नगर परिषदांना वैशिष्‍टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत मूल शहरात आठवडी बाजार व भाजी मार्केटच्‍या बांधकामासाठी 11 कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला. सदर विकास कामासाठी 7 कोटी रू. निधी खर्च करण्‍यास दिनांक 23 मे 2017 च्‍या पत्रान्‍वये मान्‍यता देण्‍यात आली होती. मंजूर 11 कोटी निधीपैकी 4 कोटी रू. निधी वितरीत करण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांच्‍यामार्फत दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजीच्‍या पत्रान्‍वये शासनाला प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला होता. वने तथा सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात पाठपुरावा करून मूल शहरातील आठवडी बाजार व भाजी मार्केट बांधकामासाठी उर्वरीत 4 कोटी रू. निधी मंजूर केला आहे.

या आठवडी बाजार व भाजी मार्केटच्‍या माध्‍यमातून मूल शहरात विकासाच्या बाबतीत आणखी एक भर घातली जाणार आहे. येत्‍या दोन महिन्‍यात या विकासकामांचे लोकार्पण करण्‍यात येणार असल्‍याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. मूल शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी आपण वचनबध्‍द असून हे शहर राज्‍यातील सर्वाधिक विकसित शहर म्‍हणून लौकीकप्राप्‍त ठरेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

००००००००