भुकंपाच्या धक्क्याने गडचिरोलीतील सिरोंचा,अहेरी हादरली



गडचिरोली, ता. ३१: जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले असून तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.
आज संध्याकाळी ६.४५ ते ६.५७ वाजताच्या दरम्यान सिरोंचा, अहेरी, मुलचेरा व चामोर्शी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सांगितले की, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या नोंदीनुसार, ७७ किलोमीटर खोलीसह ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. १९ अक्षांश व ७९.९६ रेखांशवर हा भूकंप झाला असून, गडचिरोली-तेलंगणा राज्य सीमेवरील जाफ्राबाद चक गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या केंद्रबिंदूपासून ७७ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याविषयी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. या भूकंपामुळे कुठलीही जीवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही. अहेरी तालुक्यातील अहेरी शहरासह आलापल्ली, बोरी, लगाम, जिमलगट्टा, मरपल्ली, कवटाराम, कोरेपल्ली, कमलापूर, रेपनपल्ली, गुड्डीगुडम, राजाराम खांदला इत्यादी गावांमध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. मुलेचरा तालुक्यातील काही गावे, तसेच चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातही भूकंपाच्या धक्कयांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

संबंधित विभागाकडून अधिक माहिती घेणे सुरु असून, नागरिकांनी दहशत किंवा भीती निर्माण करणारे संदेश पसरवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.