शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मनसे प्रहार तर्फे रस्तारोको आंदोलन !




वरोरा प्रतिनिधी :- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र या विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नव्हते. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी शांत का आहेत? असे प्रश्न उपस्थित होत होते, परंतु शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केल्यानंतर मात्र महाराष्ट्रात दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकरी आंदोलनात उतरले आहे. दरम्यान वरोरा तालुक्यातील नागपूर चंद्रपूर हायवे वरील टेमुर्डा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, दरम्यान नरेंद्र मोदी सरकारनी जे कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली ती रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा या चंद्रपूर नागपूर रोडवर रस्तारोको आंदोलनादरम्यान शेतकरी वेशभूषा करून आलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे किशोर डुकरे, शेरखान पठाण व इतर कार्यकर्त्यांनी शेतकऱयांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पथनाट्य सादर करून शेतकऱ्यांना शासन प्रशासनातर्फे कसे नागवले जाते? याचे प्रात्यक्षिक सादर केले. "मोदी सरकार मुर्दाबाद, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याच पाहिजे, मोदी सरकारच करायच काय ? उलटे डोके वरती पाय, भारत माता की जय" इत्यादी नारे देण्यात आले. तब्बल एक तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रस्तारोको आंदोलनाला मनसेचे नेते रमेश राजूरकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, तालुका अध्यक्ष वैभव डहाणे, प्रहार संघटनेचे किशोर डुकरे शेरखान पठाण व शेकडो शेतकरी उपस्थित होते.