▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455 ▪️ RNI No. MAHMAR/2011/37424/

डेंग्यु, मलेरिया सारख्या आजारांपासून काळजी घेण्याचे मनपा चे आवाहन !
चंद्रपूर : शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोकाही वाढला आहे. दूषित पाण्याचा पुरवठा, उघड्यावरील खाद्यपदार्थाचे सेवन, दूषित पाण्यातून प्रवास केल्यानंतर घेण्यात न आलेली काळजी, अशा अनेक कारणांमुळे साथीच्या आजाराची लागण होते. विशेषत: पाणी साचत असलेल्या परिसरात डेंग्यू मलेरिया सारखे आजार पसरण्याची भीती असल्याने प्रत्येकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर राखी कंचलवार, आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे. साथीच्या आजारांना कारणीभूत डासांच्या उत्पतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावे, तसेच घरात व परिसरात स्वच्छता ठेवल्यास आजारापासून दूर राहता येईल, विशेष म्हणजे, दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मनपाने झोन क्र. २ अंतर्गत १५ कामगारांचे पथक तयार करून बाबूपेठ, महाकाली भिवापूर व भानापेठ प्रभागात डेंग्यू व मलेरिया निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. काही कामगार फवारणी, काही धुरळणी तर इतर कामगारांद्वारे नागरीकांच्या घरी पाण्याने भरलेले कुलर, पाण्याचे टाके, ड्रम रिकामे करून यात आबेट नावाचे औषध सोडत आहे. त्यामुळे डासांची अंडी नष्ट होण्यास मदत मिळत आहे. मात्र तरीसुद्धा नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मनपाचे आयुक्त राजेश मोहिते व महापौर कंचर्लावार यांनी केले आहे.

पाणी साचू देऊ नये !

थेंबभर पाणी साचलेले आढळले तरी देखील तात्काळ ते नष्ट करावे, साचलेल्या पाण्यात डासांच्या मादीने अंडी घातल्यास त्यातून उत्पन्न होण्यास साधारणत: आठवड्याभराच्या कालावधी लागतो, दर आठवड्यातून एक दिवस आपल्या परिसरातील नियमित तपासणी करावी., पाणी साठविण्याची भांडी टाक्या आठवड्यातून एक दिवसा दिवस पूर्णपणे कोरडे ठेवून कोरडा दिवस पाळावा., स्वतःचे आरोग्य सांभाळण्यासाठी प्रत्येकांनी सजग राहणे गरजेचे आहे, असे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.
डासांची आयुष्य तीन ते सहा आठवड्यांचे असते. या आयुष्यात डासांची मादी साधारणत, तीन वेळा अंडी घालते. प्रत्येक वेळी साधारणतः 80 ते 100 अंडी घातली जातात. ही अंडी वर्षभरातपर्यंत राहू शकतात. पाण्याशी संपर्क आल्यानंतर ही अंडी फलित होवू शकतात.
डासांना अंडी घालण्यासाठी चमचाभर पाणीही पुरेसे !
मलेरिया, डेंगू पसरवित असलेल्या डासांची मादी ही आपली अंडी स्वच्छ व साचलेल्या पाण्यात घालते. ही अंडी घालण्यासाठी चमचाभर साचलेले पाणी पुरेसे असते. अंडी घातल्यापासून साधारणपणे आठवड्याभरात डासांची उत्पत्ती होते हे लक्षात घेऊन आपल्या घरात तसेच परिसरात पाणी साचू देऊ नये, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाने केले.