▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

चंद्रपुरातील त्या रुग्णाची पत्नी व मुलगी निगेटिव्ह! TRP व व्हिवर्स वाढविण्याच्या नादात खोट्या बातम्यांचा ऊत!

 
चंद्रपूर :  चंद्रपूर मधील त्या बाधित रुग्णाची पत्नी व मुलगी यांची कोरोना रिपोर्ट हि निगेटिव्ह आल्यामुळे चंद्रपूरकरांना सकाळी-सकाळी दिलासादायक शुभवार्ता मिळाली. परंतु त्यानंतर लगेच "साम" या प्रादेशिक टिव्ही वर बाधित रूग्ण निगेटिव्ह असल्याच्या बातम्या झळकल्या, यासंदर्भात शासकीय रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी असे काही झालेले नसून हे असत्य असल्याचे सांगितले. व्हीवर्स व टिआरपी वाढविण्याच्या नादात खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याने हा चिंतेचा विषय ठरत आहे. माध्यमांनी फक्त अधिकृत शासकीय बातम्या प्रसारित कराव्यात असे आव्हान चंद्रपूर चे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी वेळोवेळी केले आहे. परंतु महत्त्वाच्या शासकीय अधिकृत बातम्या ह्या स्थानिक पत्रकारांना उशिरा मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. यापूर्वीही दोन मे रोजी चंद्रपुरात कोरोनाच्या रुग्ण आढळला असे स्थानिक माध्यमांवर सर्वप्रथम प्रसारित झाले त्यानंतर फार उशिरा शासकीय अधिकृत माहिती माध्यमांना मिळाली. अनेक माध्यमांनी तर वृत्त निराधार असल्यामुळे ते प्रकाशित केलेच नाही, त्यानंतर आज आलेली बातमी ही उशिरा माध्यमांना मिळाली. काल दिवसभर बाधित रुग्णाच्या संबंधित घेतलेल्या रिपोर्ट ची माहिती काय येते, याबद्दल जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू होती. सायंकाळी उशिरापर्यंत दहा रिपोर्ट प्राप्त व्हायचे आहेत अशी माहिती देण्यात आली होती. आज सकाळी बाधित रूग्णाची पत्नी व मुलगी निगेटिव असल्याची दिलासादायक वृत्त एका प्रादेशिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले. सदर माहिती प्रथम जिल्हास्तरावर प्राप्त होणे गरजेचे होते. तसे न झाल्यामुळे याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांना विचारणा केली असता हा रिपोर्ट रात्रो बारा वाजता आम्हाला प्राप्त झाला. आमच्यासोबत हा रिपोर्ट तीन संस्थांमध्ये जातो. सदर रिपोर्ट नुकताच आपण स्थानिक प्रशासनाला दिला असून ही माहिती "लिक" कशी झाली हे न समजणारे कोडे आहे असे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाधित रुग्ण मिळाल्यानंतर जिल्हावासी व त्या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. खोट्या बातम्या, अफवा यांच्या बाजार गरम झाला आहे. अधिकृत विश्वासाची माहिती मिळावी यासाठी परिचित माध्यमांकडे विचारणा केली जात आहे. त्या अनुषंगाने कोणतीही माहिती सर्वप्रथम स्थानिक माध्यमांना अधिकृतपणे व त्वरित मिळावी यासाठी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बाधित कुटुंबामधील 2 जनांची निगेटिव रिपोर्ट आली ही चंद्रपूरकरांसाठी दिलासादायक आहे, याची अधिकृत माहिती उशिरा स्थानिक माध्यमांना प्राप्त झाली, "सबसे तेज, सबसे आगे" राहण्याच्या नादात खोट्या बातम्या व अफवांना जास्त स्थान आहे, त्यामुळे अधिकृत माहिती ही लवकरात लवकर स्थानिक माध्यमांना मिळावी, यासाठी त्वरित नियोजन व्हावे अशी अपेक्षा चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून माध्यम प्रतिनिधी करीत आहे.
"त्या" शासकीय माहितीमुळे संभ्रमाची स्थिती?
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग व केंद्र सरकारच्या covid-19 शासकीय वेबसाईटवर चंद्रपुरात चार रुग्ण संख्या दाखविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या प्रकाशित माहितीमध्ये तीन मे रोजी मनपा हद्दीत चार रुग्ण दाखवित असल्यामुळे जिल्ह्यामध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. तसेच केंद्र सरकारच्या covid-19 या लिंक वर दोन रुग्ण रिकव्हर व 2 बाधित अशी आकडेवारी प्रकाशित होत आहे. त्याच्या खुलासा यापूर्वीच जिल्हाधिकारी महोदयांनी केलेला आहे.  यापूर्वी मूल येथील ते दोन रुग्ण आता बरे झाले असून तेच दोन रूग्ण व दिल्ली ते चंद्रपूर येथील एक रूग्ण रुग्ण असून त्याच्या पत्ताही चंद्रपूर असल्यामुळे शासकीय माहितीमध्ये चार रुग्णांची नोंद आहे. तरी नागरिकांनी यासंदर्भात कोणताच संभ्रम पाळू नये व व खोट्या माहितीला प्रसिद्धी देऊ नये असे आव्हान शासनातर्फे करण्यात येत आहे.