कापूस खरेदी २०मे पर्यंत पुर्ण करण्याची आ.सुधिर मुनगंटीवार यांची मागणी

कापूस खरेदी २०मे पर्यंत पुर्ण करण्याची आ.सुधिर मुनगंटीवार यांची मागणी
चंद्रपुर प्रतिनिधी:-कोरोना विषाणूच्या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर शेतक-यांना सहन कराव्‍या लागणा-या अडचणी लक्षात घेता चंद्रपूर जिल्‍हयात 20 मे पर्यंत कापूस खरेदी पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने योग्‍य नियोजन करावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्‍याकडे केली आहे.

दिनांक 30 एप्रिल रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेत त्‍यांच्‍यासह कोरोना संदर्भात विविध विषयांच्‍या अनुषंगाने चर्चा केली. लवकरच सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेता बि-बियाणे, खते यांची टंचाई होणार नाही व शेतक-यांची गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्‍यात यावे, प्रामुख्‍याने सोयाबिनचे बियाणे शेतक-यांना सहज उपलब्‍ध होण्‍याबाबत लक्ष देण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली.

चांदा ते बांदा या योजनेच्‍या माध्‍यमातुन तसेच टाटा ट्रस्‍ट च्‍या माध्‍यमातुन ज्‍या शेतक-यांना विहीरी मंजूर झाल्‍या आहेत त्‍या विहीरींचे बांधकाम लॉकडाऊनमुळे बंद होते. ही बांधकामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने संबंधित शेतक-यांना आवश्‍यक निधी त्‍वरीत उपलब्‍ध करण्‍यात यावा, असेही त्‍यांनी सांगीतले. सध्‍या सुरू असलेला कडक उन्‍हाळा व त्‍यामुळे नागरिकांना भाषणारी तिव्र पाणी टंचाई लक्षात घेता जिल्‍हा परिषद, मनपा, नगर परिषदा, पंचायत समित्‍या यांनी सादर केलेल्‍या टंचाई निवारण आराखडयाला त्‍वरीत मान्‍यता देण्‍यात यावी, अशी सुचना सुध्‍दा त्‍यांनी यावेळी केली. जून महिन्‍यात सुरू होणारा पावसाळा लक्षात घेता नाले सफाईची मोहीम तसेच स्‍वच्‍छता व निर्जतुकीकरण करण्‍याची आवश्‍यकता लक्षात घेता मनपा, नगरपालिका व ग्राम पंचायतींना या अनुषंगाने कार्यवाहीसाठी निर्देशित करावे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.

सुदैवाने आतापर्यंत आपल्‍या जिल्‍हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही. मात्र अचानकपणे जर या संकटाचा सामना करावा लागला तर जिल्‍हयातील सा-या आरोग्‍य विषयक व्‍यवस्‍थांचे योग्‍य नियोजन करण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रामुख्‍याने पीपीई किट, एन-95 मास्‍क, आयसीयु बेड, कोरंटाईन सेंटर्स, भोजन व्‍यवस्‍था, विभाग सील करण्‍याचे नियोजन, विशेष रूग्‍णवाहीका, औषधी या व्‍यवस्‍थांसह अशा आणीबाणीच्‍या प्रसंगात प्रशासन चुस्‍त ठेवण्‍याचया दृष्‍टीने योग्‍य नियोजन करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासोबतच बाहेरील व्‍यक्‍तींना आत आणणे व आतील व्‍यक्‍तींना बाहेर पाठविणे हे करताना सावधानी व सुरक्षीतता बाळगण्‍याची विशेष खबरदारी घेण्‍याची आवश्‍यकता त्‍यांनी या चर्चेदरम्‍यान प्रतिपादीत केली.

त्‍याचप्रमाणे आरोग्‍य सेतु अॅपमध्‍ये नागरिकांची नोंदणी करणे, जिल्‍हयातील डॉक्‍टर्सचे वेबीनार करणे, चंद्रपूर जिल्‍हयात आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचा आराखडा तयार करत सर्व आवश्‍यक माहिती सहजपणे उपलब्‍ध होईल याची व्‍यवस्‍था करणे, लॉकडाऊननंतर काही गोष्‍टींसंदर्भात शिथीलता देताना सुरक्षीतता घेण्‍याची आवश्‍यकता लक्षात घेता जनजागरण करावे असेही त्‍यांनी यावेळी जिल्‍हाधिका-यांना सुचविले. या सर्व सूचनांच्‍या अनुषंगाने प्राधान्‍याने आवश्‍यक कार्यवाही करण्‍यात येईल, असे आश्‍वासन जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले. सदर बैठकीला जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, उपमहापौर राहूल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे यांची सुध्‍दा उपस्थिती होती.