कुंभार समाजाला टाळेबंदीत कामे करण्याची परवानगी, उपासमार टाळण्यासाठी ना.वडेट्टीवारांचा दिलासा

कुंभार समाजाला टाळेबंदीत कामे करण्याची परवानगी, उपासमार टाळण्यासाठी ना.वडेट्टीवारांचा दिलासा

चंद्रपूर ,दि.15 एप्रिल : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले. संपूर्ण लॉकडाउन म्हटल्यावर सर्वच थांबलं. वाहतूक थाबली, कामधंदे थांबले. मात्र या लॉकडाऊनमुळे कुंभार समाजावर मोठे आर्थिक संकट आले आहे, हे लक्षात येताच चंद्रपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कुंभार व्यावसायिकांची भविष्यातील होणारी उपासमार टाळावी यासाठी कुंभार व्यवसाय करणाऱ्यांना टाळेबंदीत काम करण्याचे आदेश काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

कुंभार समाज प्राचीन काळापासून मातीपासून मूर्ती, भांडी, विटा तयार करण्याचे काम करीत आहे. या पारंपरिक व्यवसायावरच समाजाचे जीवन अवलंबून आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक तालुक्यात 2 हजाराहून अधिक संख्येने हा समाज जिल्ह्यात निवास करून आहे. दिवाळीत पणत्या, मुर्त्या तयार करून या समाजाच्या कामाला सुरुवात होते. यानंतर फेब्रुवारी अखेरीपासून ते मे पर्यंत गरिबांचे फ्रिज म्हणून ओळखले जाणारे माठ, घागर, रांजण,नांद,विविध मुर्ती जालना,सेलु,मंठा,आष्टी,तयार केले जाते आणि मार्च महिन्याच्या अखेरीस विक्रीला सुरुवात होते. मात्र यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस देशभरात लॉकडाउन जाहीर झाले त्यामुळे उन्हाळ्यात गरिबांचे फ्रिज म्हणून ओळखल्या जाणारे माठ, सूरई सह ईतर वस्तूची विक्री ठप्प झाली. मार्च ते मे या चार महिन्याच्या कालावधीतच कुंभार समाजाचे पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन असते ते सुध्दा कोलमडून पडले. त्यामुळे भविष्यात उपासमार होऊ नये म्हणून माठ व इतर वस्तूची विक्री करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी कुंभार समाजाच्या विविध स्तरावरून पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे करण्यात येत होती. या मागणीची तात्काळ दाखल घेऊन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांनामाहिती दिली. तसे आदेश काढण्याचे निर्देशित केले. जिल्ह्यातील कुंभार बांधवाना त्यानी निर्माण केलेल्या माठ व तर वस्तूची विक्रीस परवानगी दिली आहे.

कुंभार समाज हा अत्यंत कष्टकरी म्हणून ओळखला जातो. कुंभारकाम या पारंपरिक व्यवसायातून प्राप्त उत्पन्न अत्यल्प असल्याने कुंभार समाज आर्थिकदृष्ट्या मागे पडलेला दिसून येतो. कुंभार समाजाचा इतिहास गौरवशाली असला तरी सद्यस्थितीत हा समाज कष्टप्रद जीवन जगत आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात कुंभार व्यावसायिकांना माठ विक्रीसाठी कोणीही अडवू नये, त्याना जिल्ह्यातच वाहतुकीची परवानगी देण्यात यावी असे, निर्देश पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले आहे.

कुंभार समाजाचा पारंपारिक व्यवसाय हा सोशल डिस्टन्स ठेऊनच केला जातो. यात कुठल्याही प्रकारची गर्दी नसते हा विचार करून भविष्यात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये व त्यांचे वार्षिक आर्थिक नियोजन बिघडू नये म्हणून लॉकडाउनच्या काळात कुंभार व्यावसायिकांना काम करण्याची परवानगी देऊन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी कुंभार समाजाला मोठा दिलासा दिला आहे.