रेशनकार्ड नसलेल्या गरीब नागरीकांना धान्य उपलब्ध करण्यात यावे:-आ.सुधिर मुनगंटीवार

रेशनकार्ड नसलेल्‍या गरीब नागरिकांना धान्‍य उपलब्‍ध करण्‍यात यावे – आ. सुधीर मुनगंटीवार

खनिज विकास निधी किंवा जिल्‍हा वार्षीक योजनेअंतर्गत निधी उपलब्‍ध करण्‍याची मागणी


चंद्रपूर प्रतिनिधी:- जिल्‍हयातील ज्‍या गरीब व गरजू नागरिकांकडे रेशनकार्ड उपलब्‍ध नाही अशा नागरिकांना स्‍वस्‍त धान्‍य दुकानातुन धान्‍य उपलब्‍ध करण्‍यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिका-यांकडे केली आहे. यासाठी जिल्‍हा वार्षीक योजना किंवा खनिज विकास निधी अंतर्गत निधी उपलब्‍ध करण्‍यात यावा अशी मागणी सुध्‍दा त्‍यांनी केली आहे.

कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने 1.70 लाख कोटी रूपयांचे पंतप्रधान गरीब कल्‍याण पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज अंतर्गत शिधापत्रिका धारकांना मोफत धान्‍य देण्‍याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. चंद्रपूर जिल्‍हयातील अनेक गोरगरीब नागरिकांकडे, मजूरांकडे रेशनकार्ड उपलब्‍ध नाहीत. अशा रेशनकार्डापासून वंचित असलेल्‍या गरीब नागरिकांना धान्‍य उपलब्‍ध करण्‍यासाठी खनिज विकास निधी अंतर्गत किंवा जिल्‍हा वार्षीक योजनेअंतर्गत निधी उपलब्‍ध करण्‍यात यावा व धान्‍य उपलब्‍ध करून देण्‍यात यावे, अशी मागणी त्‍यांनी जिल्‍हाधिका-यांकडे केली आहे.