डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयातर्फे जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न!



डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक ग्रंथालय चंद्रपूर च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयासाठी ग्रंथालयाच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन व ग्रंथालयाचे ई ग्रंथालयांत रुपांतर करणे याबाबत एकदिवशीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक ४ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळात ग्रंथालय सभागृहात करण्यात आले होते.

श्री. दिपांजन चटर्जी प्रकल्प अधिकारी नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत कार्यशाळेत प्राध्यापक शालिनी लिहीतकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांनी सार्वजनिक ग्रंथालयाचे व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. र.चं. नलावडे यांनी ई ग्रंथालयाची तोंड ओळख या विषयावर मार्गदर्शन केले. 

श्री. दिपांजन चटर्जी यांनी आर. आर. फाऊन्डेशन कोलकत्ता च्या योजनेच्या संदर्भात विस्तृत माहिती दिली. संस्थेचे सचिव व नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव श्री. राजेश्वर सुरावार संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. राजीव गोलीवार जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे निर्गम सहाय्यक श्री. नरेश काळे प्रामुख्याने व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे सर्व कर्मचारी वृद यांनी सहकार्य केले.