मेंढपाळाचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षकवडील इतरांचे शेळ्या मेंढ्या गुरे राखण्याचे काम करीत असलेल्या डोनाळा येथील गरीब कुटुंबातील जन्म घेतलेल्या राकेशने एमपीएससी ची परीक्षा पाचवी रॅंक पास करून पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. राकेश कौशल्याबाई बंडूजी अल्लीवार असे या मुलाचे नाव आहे.जिद्द चिकाटीने अभ्यास करून एमपीएससी ची परीक्षा देत पिएसआय पदाला गवसणी घातली आहे.

बंडू अल्लीवार हे मूळचे मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील असून कुरमार (धनगर) समाजातील आहेत कुरमार समाज आजही मेंढपाळीचा व्यवसाय करीत आहे.कुरमार समाजात आतापर्यंत एमपीएससी यूपीएससी च्या परीक्षेत उत्तीर्ण होणारे राकेश हे पहीले आहेत.


बंडू अल्लीवार यांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शेळ्या मेंढया- गुरे राखण्यासाठी 30 वर्षांपूर्वी डोनाळा येथे स्थायिक झाले. आई वडील दोन्ही अशिक्षित असताना व जवळच्या नातेवाईकांना शिक्षणाचा गंध नसतानासुद्धा राकेशने शिक्षणाकडे कल वळविला, राकेश शिक्षणात हुशार होता. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा डोनाळा येथून तर माध्यमिक शिक्षण भय्याजी पा. भांडेकर हायस्कूल ,कापसी येथून पूर्ण करून गडचिरोली येथे इलेक्ट्रिक इंजिनियर ची पदवी पूर्ण केली.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळत अभ्यासाला सुरवात केली. वनपरीक्षेत्र, तलाठी, एसटीआय, एएसओ या पदावर प्रतीक्षा यादीत येत थोडक्यात संधी हुकत गेली मात्र राकेशने परंतु जिद्द सोडली नाही. जिद्द चिकाटी मेहनतीच्या बळावर असाध्य ते साध्य करता येते याचा प्रत्यय राकेशने आणून देत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. या यशात आई, वडील, बहीण, भाऊजी यांची साथ व आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.