वस्तीगृहातील विद्यार्थी उपाशी




गोंडवाना विद्यापीठाच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न तात्काळ निकाली काढा अन्यथा घेराव आंदोलन- विद्यार्थ्यांसोबतची गैरसोय खपवून घेणार नाही- सिनेट सदस्य, युवासेना विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांचा विद्यापीठ प्रशासनाला इशारा

गोंडवाना विद्यापीठातील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी गेले तीन-चार दिवसापासून जेवण न मिळाल्यामुळे उपाशी आहेत. जेवणासाठी आंदोलन करीत आहेत, कुलगुरू स्वतः त्यांना जाऊन विद्यार्थ्यांना भेटल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की आपणापैकी कोण उपाशी आहेत त्यावेळी विद्यार्थ्यांनी जेवण न केल्याचे सांगितल्यावर देखील कुलगुरू डॉ प्रशांत बोकरे विचारणा करून उपाययोजना न करता निघून गेले



यावरून कुलगुरू व विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. आज परत विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं, त्यानंतर कुलगुरूंनी त्यांच्या जेवणाची तात्पुरती व्यवस्था करण्याबद्दल त्यांना आश्वासित केले आहेत. कुलगुरूंनी दिलेले आश्वासन ते पाळतील ही अपेक्षा आहे. परंतु हा प्रश्न तात्पुरत्या सोयीने सुटणार नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना जेवण, प्रवेश व हॉस्टेल तिन्ही मोफत राहील अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आली आणि आता मात्र त्यांच्याकडून पैसे मागत असल्याबाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे.


माननीय राष्ट्रपती महोदया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये आलेल्या असताना कुलगुरू यांनी राष्ट्रपतींच्या समक्ष जाहीरपणे बोलताना गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला एकही रुपया लागणार नाही असे उदगार काढलेले आहे. परंतु कुलगुरू बोललेले शब्द पाळत नाहीत असा वारंवार अनुभव येत आहे. अनेक विद्यार्थी कुलगुरूंच्या उदासीन धोरणामुळे शिक्षण सोडून जेवण मिळणार नाही म्हणून गावाला परत जात आहे.


ही बाब विद्यापीठाच्या प्रतिष्ठेसाठी चांगली नाही.
गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे की कशासाठी हेच कळत नाही?. एकीकडे "विद्यापीठ आपल्या गावी" योजना सुरू केल्याची शाबासकी मिळविली जाते मात्र दुसरीकडे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न चार दिवसापासून सुटू शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था लवकरात लवकर करावी, अन्यथा आम्हाला विद्यापीठात येऊन विद्यापीठाला विद्यार्थ्यांसह घेराव घालावा लागेल असा इशारा सिनेट सदस्य , प्रा. निलेश बेलखेडे, यांनी दिला आहे.