शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा Congress march on tehsil to address various problems of farmers



मूल - शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात घुसून नासधूस करणाऱ्या वन्य प्राण्यांनी तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले. तसेच मानव वन्यजीव संघर्षातून तालुक्यासह परिसरात अनेकांचे बळी गेले. मात्र वनविभाग या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तर वनमंञ्याच्या स्थानिक मतदारसंघातील गंभीर प्रश्नांना घेऊन आज काँग्रेसने राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात तहसील कार्यालयावर हजारोंच्या उपस्थितीत जनाक्रोश मोर्चा काढत वनविभाग व सरकारचा निषेध नोंदविला.

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून सर्वदूर परिचित आहे. सध्या शेती हंगाम हा अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांच्या शेतात हिरवे सोने म्हणजेच धान पीक उभे आहे. मात्र मुल तालुक्याला वन परिसर लागून असल्याने वनातील वन्य प्राणी यात मोठ्या प्रमाणात रान डुक्करांनी शेतात घुसून प्रचंड प्रमाणात हौदोस शेतपिकांचे नुकसान केले आहे. अशा गंभीर परिस्थितीत आधीच कर्जबाजारीमुळे त्रस्त असलेल्या बळीराजाला आता जीव देण्याची पाळी आली आहे. तर वन्य प्राण्यांच्या धुमाकूळ यात झालेली नासधूस याचे वनविभागा मार्फत पंचनामे केले जाते मात्र नुकसान भरपाई म्हणून केवळ तोकडे व अत्यल्प मदत देऊन वन प्रशासनामार्फत शेतकऱ्यांची थट्टा केली जाते. सोबतच शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजूर यांचेवर वन्य प्राण्यांनी चढविलेल्या हल्ल्यात अनेकांचा नाहक बळी गेला. व अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. 



वनमंञ्याच्या स्थानिक मतदार संघातील मुल तालुक्यात सुरू असलेल्या या गंभीर घटनांकडे मात्र वन विभागासह वनमंञ्यांनी देखील असंवेदनशीलतेचा कळस गाठला असल्याचा आरोप आ. वडेट्टीवार यांनी केला. आज काँग्रेसने राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलवर मोर्चा काढला.


स्थानिक तहसिल कार्यालय समोर झालेल्या जाहीर सभेत संबोधित करताना राज्याचे विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात धर्मांधता पसरवून, जाती जाती मध्ये भांडणे लावून अराजकता माजविल्या जात आहे. अच्छे दिनाचे खोटे वादे करून महागाई वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले जात आहे. 



भाजप नेत्यांच्या कंपन्या व दुकानदारी चालविण्यासाठी खाजगीकरणातून कंत्राटी भरती करून युवकांचे भविष्य उध्वस्त करू पाहणाऱ्या अश्या निर्दयी व भ्रष्ट सरकारला जाग आणण्यासाठी आता संघर्षाचा मार्ग पत्करावा लागणार असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला पायउतार केल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या जीवांना पैशाच्या तराजूत तोळता शेतीचे उध्वस्त करणाऱ्या व मनुष्याच्या जीवावर उठणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने स्वतः करावा अन्यथा धुडगूज घालणाऱ्या व हल्ले चढवणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने प्रत्येक शेतकऱ्याला अधिकृत परवानगी देऊन शस्त्र वाटप करावे. तसेच वनविभागाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. असा सज्जड इशारा देत विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांनी वनविभाग व सरकारचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.



सभेपुर्वी बाजार समिती पासुन तहसिल कार्यालया पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ. विजय वडेट्टीवार आणि संतोषसिंह रावत हे बैलबंडीवर उभे होते. सभेनंतर तहसीलदार मुल यांना लेखी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने काँग्रेस नेते संतोषसिंह रावत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार , शिवा राव, महिला काँग्रेसच्या माजी जिल्ह्याध्यक्ष चित्रा डांगे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, उपाध्यक्ष रमिज शेख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले, बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, घनश्याम येनुरकर, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पवन निलमवार, महीला काँग्रेसच्या अध्यक्ष रूपाली संतोषवार, नलिनी आडपेवार यांचेसह मुल तालुका काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, विविध सहकारी संस्थेचे सदस्य यांचेसह हजारोंच्या संख्येने शेतकरी शेतमजूर, महिला व युवक उपस्थित होते.