गडचिरोली : जिल्ह्यातील राजकारणात आपला ठसा उमटविणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती अतुल गण्यारपवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला ठाण्यात बोलवून सराईत आरोपीप्रमाणे वागणूक देणे योग्य नव्हतेच. परंतु खांडवे यांच्या एकूण कामगिरीकडे पाहता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर त्यावेळी थेट कारवाई करणे टाळले असावे. मात्र यामुळे खांडवे यांनी आपण कसेही वागलो तरी चालते, असा गैरसमज करून घेत चक्क न्यायाधीशांनाच त्यांच्या निवासस्थानी जाऊन असभ्य वागणूक दिली. यावेळी मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खांडवे यांना आवर घालणे गरजेचे समजून अखेर त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.
नुकतेच एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. त्यात चामोर्शी बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात माजी सभापती अतुल गण्यारपवार यांचा पॅनल होता. ते स्वत: ही उमेदवार होते. २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. त्याच पहाटे ठाणेदार राजेश खांडवे यांनी अतुल गण्यारपवार यांना ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्या व बुटाने मारहाण केल्याचा आरोप अतुल गण्यारपवार यांनी केला. मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक खांडवे यांच्यावर
गुन्हा नोंदवण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शीत आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत २० मे रोजी खांडवेंवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. दरम्यान, २५ मे रोजी सकाळी खांडवे हे न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी गेले. गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यावरून खांडवे यांनी न्या. मेश्राम यांच्याशी हुज्जत घालून धमकावले. या प्रकरणी राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवला असून निलंबनाची कारवाई करण्यात आली.पो.नि.राजेश खांडवे यांना २ जून रोजी उपअधीक्षक साहील झरकर यांनी गडचिरोलीतून ताब्यात घेतले. दुपारी चामोर्शी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर खांडवेंची रवानगी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली.