रेल्वेच्या भिषण अपघातात शेकडो प्रवाशांचा मृत्यू Hundreds of passengers died in a terrible train accident




बालासोर : ओडिशातील बालासोर येथे काल संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांनी रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. देशातील हा आजवरचा सर्वात मोठा अपघात आहे. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते. या दुर्देवी आणि भयंकर अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे. तसेच अपघातात आतापर्यंत 900 प्रवासी जखमी झाले आहेत. कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.


अपघात झाला तेव्हा या अपघातात 50 ते 70 लोक दगावल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशिरा हा आकडा 120 वर पोहोचला. तसेच जखमींचा आकडाही 350 वर गेला. मात्र, सकाळपर्यंत मृतांचा आकडा 233 आणि जखमींचा आकडा 900 झाला आहे. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


सर्व ट्रेन रद्द

जखमींना सोरो सीएसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या या रुटच्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मदतकार्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफची पाच पथक अहोरात्र मेहनत घेत आहेत.

जखमींसाठी बसेस

तसेच मृत आणि जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी या ठिकाणी 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, जखमींची संख्या अधिक असल्याने रुग्णवाहिकांसोबत काही बसेसही तैनात करण्यात आल्याचं ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं.


तीन गाड्या धडकल्या

या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. तसेच 600 ते 700 रेस्क्यू फोर्सचे जवानही मदतकार्य करत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन रात्रभर सुरू होतं. अजूनही सुरू आहे. एकूण तीन ट्रेनची एकमेकांना धडक बसल्याने हा अपघात झाला. हावडा एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. सर्वात आधी हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. त्यानंतर मालगाडी कोरोमांडलला जाऊन धडकली.



मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख

या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींसाठी दोन लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50 हजाराच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.