त्या ग्राम पंचायतच्या विरोधात ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा Warning of agitation by villagers against that Gram Panchayat

div>

मूल (प्रतिनिधी): नियमाला बगल देत करोडो रूपयाच्या निधीची विल्हेवाट लावणाऱ्या फिस्कुटी ग्राम पंचायतच्या संपुर्ण साहित्य खरेदी आणि बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी फिस्कुटी येथील नागरीकांनी आज (शुक्रवारी) मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी देव घुनावत यांच्याकडे केली असुन 15 दिवसाच्या आत कारवाई न केल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करून असा इशाराही निवेदनातुन दिला आहे.


मूल तालुक्यातील मौजा फिस्कुटी ग्राम पंचायत मध्ये सन 2020-21 मध्ये जिल्हा निधी आणि जनसुविधा निधी अंतर्गत करोडो रूपये मंजुर झाले होते. यानिधीमधुन वाचनालय नसलेल्या गावात 7 लाख रूपयाचे 17 आलमारी आणि 18 बुककेस खरेदी केल्याचे प्राप्त बिलावरून दिसुन येत आहे. बिना जि एस टीच्या संगणक बिलावरून 2 लाख रूपये मंजुर करण्याचा प्रकारही या ग्राम पंचायतमध्ये झालेला आहे. दोन ते अडीच हजाराची खुर्ची 11918 रूपये आणि चार ते पाच हजाराची खुर्ची 20546 रूपयामध्ये खरेदी करून 3 लाख रूपये रफादफा करण्याचा कारस्थानही याग्राम पंचायत मध्ये झालेला आहे. जिल्हा निधी अंतर्गत 5 लाख रूपयामधुन 720 रूपये प्रमाणे 693 वॉटर कॅन खरेदी केले आहे. मूल मध्ये कमी किंमतीमध्ये मिळणारी वॉटर कॅन पोंभुर्णा येथुन खरेदी करण्याचा प्रकार याठिकाणी झालेला आहे. कचराकुंडयासाठी प्राप्त झालेल्या 3 लाख निधी मधुन 40 स्टिल कचराकुंडया 19750 रूपये प्रमाणे सन 2020-21 मध्ये खरेदी करण्यात आलेली आहे. मात्र अजुनही गावात कचराकुंडया लावण्यात आलेल्या नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. घंटागाडी आणि ई रिक्षा खरेदी करताना बाजारभावापेक्ष जास्त दराने खरेदी केल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.


नियमाला डावलुन सुमारे 1 करोड 27 लाख रूपयाच्या कामाची ऑफलाईन निवीदा ग्राम पंचायतने काडुन 22 कामे अंदाजकिय दरानुसार तर 23 कामे 0.10 दरानुसार मंजुर करण्यात आलेले आहे. बोगस निवीदा प्रक्रिया राबविण्यात आल्याने एकाचा कंत्राटदाराला 45 कामे मंजुर केल्याचा प्रकार याग्राम पंचायमध्ये घडलेला आहे. यासंपुर्ण खरेदी प्रकरणाची चौकशी 15 दिवसाच्या आत करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी फिस्कुटीचे माजी सरपंच अनिल निकेसर, नेताजी जेंगठे, सुरेश कामडे, तय्युब अनवरखॉ पठाण, आनंदराव आंबोरकर, चांगदेव कामडे, संजय गिरडकर, लिलाधर शेंडे, विठ्ठल चौधरी, नितीन राउत यांनी मूल पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे केली आहे.