महीला डाॅक्टरने दिले अनोखे "आरोग्य वाण"A unique "health variety" given by a female doctor




गडचिरोली (दिनांक २६ जानेवारी) : मकरसंक्रांती म्हटली की,‎ महिलांचा जिव्हाळ्याचा विषय‎ येतो. संक्रांतीनिमित्त महिला‎ आपल्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम‎ ठेवत वाण म्हणून एकमेकींना‎ भेटवस्तू देतात. या पारंपारिक पद्धतीमध्ये‎ थोडा बदल करत अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमने आगळावेगळा उपक्रम आयोजित केला. रुग्णालयात आजवर उपचारासाठी आलेल्या महिला, विविध आजारासाठी शस्रक्रिया झालेल्या रुग्नांना एकत्रित आणत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर यांनी "आरोग्याचे वाण" वाटले. विशेष म्हणजे वाण म्हणून एखादी भेटवस्तू न देता व्हिटॅमिन, कॅल्शिअम आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक गोळ्या आणि औषधी वितरित केली.

स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था असल्यामुळे आजार बळावतो. महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शन करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त आरमोरी येथील अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होममध्ये २५ जानेवारी रोजी "आरोग्याचे वाण" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या वसुधा कोपुलवार, शकुंतला गंटावार, सेवानिवृत्त शिक्षिका चव्हाण, बघमारे यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. शिलू चिमुरकर यांनी सर्व महिलांना आरोग्यासाठी तीळ-गुळाचे महत्व, दैनंदिन जीवनात घ्यावयाची काळजी आणि निरोगी आरोग्यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपचारासाठी आलेल्या महिला, प्रसूती झालेल्या स्तनदा माता आणि विविध आजारावर शस्रक्रिया झालेल्या महिला रुग्नांना व्हिटॅमिन, कॅल्शिअम गोळ्या आरोग्याचं वाण म्हणून देण्यात आले. बालिका दिनाचे औचित्य साधून रुग्णालयात जन्मलेल्या दोन बाळांची संक्रातीनिमित्त लूट करण्यात आली.

आरमोरी येथील वडसा मार्गावर असलेल्या अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमची मागील ४ महिन्याआधी सुरवात झाली. प्रारंभीपासून सामाजिक सेवेचे व्रत घेऊन आरोग्यसेवा दिली जात आहे. या भागात आरोग्याची अत्याधुनिक सुविधा नव्हती. त्यामुळे इथल्या रुग्णांना दूरच्या मोठ्या शहरात जावे लागायचे. मात्र, अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमची स्थापना झाल्यापासून इथल्या रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. तेव्हापासून आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची या नक्षलग्रस्त भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येऊ लागलीत. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर यांनी अवघ्या ४ महिन्यात आतापर्यंत ११ यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. यातील ८ शस्त्रक्रिया या गर्भाशयाशी निगडित होत्या. महिलांना अनेक कारणांमुळे गर्भपिशवी साफ करावी लागते. अशा जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे हाताळून महिलांना जीवनदान देण्याचे काम डॉ. शिलू चिमुरकर यांनी केले. महिलांना अंगावर पांढरे जाणे, मासिक पाळीच्या तारखा चुकणे, खाज सुटणे, संबंधानंतर लाल जाणे आदी समस्यांचे निराकरण त्यांनी केले.