It is a matter of happiness to break the bonds of sub-castes and come under one umbrella....Mungantiwar उपजातींची बंधने तोडत एक छत्राखाली येतोय ही आनंदाची बाब .... मुनगंटीवार





चंद्रपूर : ‘बेलदार समाज विकासाच्या बाबतीत आपली रेष मोठी करून वाटचाल करणारा समाज आहे. बेलदार समाज उपजातींची बंधने तोडत एक छत्राखाली येतोय ही आनंदाची बाब आहे . केंद्राच्या यादीत बेलदार उपजातींबाबत अद्यापही उल्लेख नाही. त्यामुळे उपजातींचा विषय घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू’, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विदर्भ बेलदार समाजाच्यावतीने आयोजित १९ व्या राज्यस्तरीय बेलदार समाज उपवर वधू मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला बेलदार समाजाचे प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर कोट्टेवार, प्रांतीय कार्याध्यक्ष आनंद अंगलवार, प्रांतीय सचिव रवींद्र बंडीवार, प्रांतीय उपाध्यक्ष राजेश कात्रटवार, कन्नमवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, जिल्हा अध्यक्ष आनंद कार्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष सूरज पेदुलवार,शहर अध्यक्ष सचिन चलकलवार, प्रभा चिलके, प्रीती तोटावार, अरविंद गांगुलवार, आरती अंकलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांचे स्मरण व अभिवादन करीत ना.मुनगंटीवार म्हणाले की, कन्नमवारजी यांनी सदैव महाराष्ट्र धर्म जागविला. ते कोणत्याही पक्षाचे किंवा समाजापुरते मर्यादीत नव्हते. त्यांनी केलेले कार्य जात-पात, समाज, धर्म, पक्षीय राजकारण याही पलीकडचे होते. त्यामुळे मूल येथे मा. सा. कन्नमवारांचे उत्कृष्ट स्मारक उभारण्याचे सौभाग्य आपल्याला मिळणे ही मोठी बाब आहे. मूलमध्ये कन्नमवारांचा पुतळा आणि संवाद भवन आता दिमाखात उभारले गेले आहे. मा. सा.कन्नमवारांनी समाजासाठी अमूल्य योगदान दिले, त्यांच्यासाठी काही तरी करावे ही आपली ईच्छा यामधून पूर्ण झाली असे ते म्हणाले.

बेलदार समाजातील उपजातींमध्ये आता रोटी-बेटी व्यवहार सुरू झाला आहे. त्यामुळे उपजातींची बंधने आता नाहीशी होत आहेत. संपूर्ण समाजासाठी हे पाऊल प्रेरणा देणारे ठरणार आहे. बेलदार समाज हा कष्टकरी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे. या समाजातील बांधवांना सोबत घेत केंद्र सरकारकडे समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वशक्तीनिशी निश्चित प्रयत्न करू, असे ना.मुनगंटीवार यावेळी म्हणाले.