2006 ते 2007 चा काळ होता. नवरगाव येथून चंद्रपुरात स्थायिक झालो होतो. तेव्हा धनगर समाज संघटन सुरू होते. अनेक आंदोलन, मोर्चे आणि कार्यक्रम व्हायचे. त्याच्या बातम्यांची माहिती वृत्तपत्रांना देत होतो. माझे गुरुवर्य, मोठे बंधू आमच्या सिंदेवाही तालुक्याचे नंदुभाऊ परसावार nandkishor parsawarहे लोकमत वृत्तपत्रात काम करीत होते. माझ्या अनेक कार्यक्रमाच्या बातम्या नंदुभाऊमुळे लोकमत वृत्तपत्रात प्रकाशित व्हायच्या. त्याच काळात सकाळ वृत्तपत्र चंद्रपुरात सुरू झाला.
तेव्हा देवनाथ गंडाटे सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार होता. नंदुभाऊच्या माध्यमातून देवनाथसोबत भेट झाली. आम्ही दोघे जवळपास २००६ किंवा २००७ मध्ये भेटलो. आम्हच्या भेटीगाठी नेहमी होत राहायच्या. अश्यातच नंदुभाऊचे भंडारा येथे बदली झाली आणि मी पोरका झाल्यासारखा झालो. मात्र, देवनाथ आणि मी समवयस्क असल्याने त्यांची आणि माझी घट्ट मैत्री झाली. खरंतर देवनाथ हा माझ्या वयापेक्षा दोन वर्षाने लहान असला तरी पत्रकारिता क्षेत्रात माझा गुरू बनला. अनेक विषयांवर चर्चा व्हायची. मी लिहलेल्या बातम्यांच्या चुका काढून सुधारणा समजावून सांगायचा. त्याच्यात सामाजिक भान होते. त्यामुळे माझ्यासारख्या समाज चळवळ चालविणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना तो स्वतः हुन बातमीच्या माध्यमातून सहकार्य करायचा. देवनाथ कधीही पैशाच्या मागे लागला नाही. विश्वास आणि प्रामाणिकपणा कायम ठेवला. अनेक नेत्यांच्या विरोधात धाडसाने बातमी लावल्या. पण, सौदेबाजी केली नाही. त्याला अनेकजण प्रत्यक्ष चेहऱ्याने फार कमी ओळखायचे. सडपातळ बांधा आणि कुणीही धक्का दिल्यास कोसळेल, अशीच शरिरयष्टी होती. अनेक वर्ष त्याची पत्रकारिता संघर्षमय राहिली.
2009- 10 मध्ये चंद्रपुरात अदानी चे आंदोलन सुरू झाले. त्यापूर्वीच त्याचे बंडूभाऊ धोत्रेंसोबत संपर्क होते. अदानी गो बॅकच्या adani आंदोलनात देवनाथच्या आग्रहामुळे मी सहभागी झालो. पत्रकारितेतील नोकरीमुळे देवनाथ प्रत्यक्ष सामाजिक कार्यात सहभागी होत नव्हता. मात्र अप्रत्यक्षरीत्या अनेक सामाजिक संघटनांना त्याची मदत आणि सहकार्य असायचे.
२०१०मध्ये लग्न झाले. यानिमित्त त्याच्या स्वगृही मेहा बूज. येथे तीन दिवसांसाठी मुक्कामी बोलावून घेतले. विवाहाच्या 3-4 वर्षांनी देवनाथ एका नोकरीची संधी आली. त्यामुळे सकाळ वृत्तपत्र सोडून थेट अलिबाग (मुंबई) गाठले. मी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा अलीबागवरून आवर्जून भेटण्यासाठी आला होता. वर्षभराने नागपुरातील सकाळ वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून संधी मिळाली. सुमारे 19-20 वर्षाचा हा पत्रकारितेला प्रवास झाला. मात्र, संघर्ष कायम आहे. बदलत्या काळात माध्यम बदलले. त्यानुसार देवनाथने वेब डिझाईन आणि मार्केटिंगमध्ये स्वतः चा व्यवसाय सुरू केला. आज संपूर्ण महाराष्ट्रात जाळे पसरले असून दोनशेहून अधिक ग्राहक आहेत. नवीन पत्रकारितेला तंत्रज्ञानाची जोड देऊन सर्वांना मार्गदर्शन करण्याचे काम सध्या करीत आहे.
अश्या माझ्या मित्राला, भावाला, गुरुला आज 14 डिसेंबर रोजी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
- संजय कन्नावार