आयुष्यात यशाची शिखर गाठायचे असेल तर शिक्षणाचे महत्त्व समजून घ्या. समाजात मान, प्रतिष्ठा आदर, सन्मान मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सकारात्मक विचार तथा प्रयत्नांची पराकाष्टा करून जिद्द चिकाटी च्या भरोशावर तसेच उच्च शिक्षणाच्या सहाय्याने यशाचे उंच शिखर गाठता येईल असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते सिंदेवाही येथे आयोजित करिअर मार्गदर्शन व मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते,तथा आ. विजय वडेट्टीवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विनोद आसुदानी, जि. प. माजी सभापती दिनेश चिटनुरवार, सिंदेवाही काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अरुण कोलते, माजी तालुकाध्यक्ष वीरेंद्र जयस्वाल, शहर अध्यक्ष सुनील उट्टलवार, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपाध्यक्ष मयूर सुचक प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी मंत्री, आ.वडेट्टीवार म्हणाले की, आयुष्यात अनेक अडचणी संकटी येतात मात्र या संकटांना तोंड देत मार्ग काढून त्यावर विजय कसा प्राप्त करता येईल यासाठी सदैव प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. मनुष्याचे खरे धन हे शिक्षणातून मिळालेले ज्ञान हेच असून ते कुणीही सोडू शकत नाही. स्वप्नाला वास्तव्याची साथ मिळाल्यास यश प्राप्ती मिळून उद्दिष्ट गाठता येईल व आपले भविष्य उज्वल ही करता येईल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विनोद आसूदानी यांनी मार्गदर्शनपर बोलताना सांगितले की, तारुणा अवस्थेत शिक्षण घेताना इतर प्रलोभनांना बळी न पडता मनाची एकाग्रता टिकवून ध्येय साध्य करण्या हेतू प्रयत्नशील असावे. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून मनुष्य जीवनाला कलाटणी देणारे फार मोठे शस्त्र आहे हे त्यांनी मार्गदर्शनातून समजून सांगितले.
यानंतर विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची मोफत पुस्तके वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आधार फाउंडेशन चे दिनेश मलिये यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार फाउंडेशन चे मुकेश चौबे, तेजस्विनी लढे इमरान खान अभिषेक शुक्ला आशिष पराते यांनी अथक परिश्रम घेतले. आयोजित कार्यक्रमास सिंदेवाही, मुल, सावली, नागभीड व चिमूर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.