सावली ता.प्र.दि.30/11/2022 :- गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाल्याने अखेर अतिक्रमणं धारकांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,काँग्रेस नेते, तथा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार Vijay wadettiwar यांचे कडे आपली व्यथा मांडली. अखेर शासनाच्या या अडेलतट्टू धोरणाविरोधात माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांचे नेतृत्वात सावली काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार , काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जि.प. सभापती दिनेश चीटनुरवार , नगराध्यक्षा लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदिप पुण्यापवर, काँग्रेस शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, काँग्रेस महीला तालुका अध्यक्ष उषा भोयर, माजी तालुका अध्यक्ष राजेश सिद्धम, माजी प. स. सभापति विजय कोरवार, तसेच नगरपंचायत सावलीचे सर्व सभापति, नगरसेवक, नगरसेविका, सर्व सेल पदाधिकारी व बहूसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन पर बोलतांना माजी मंत्री आ. वडेट्टीवार म्हणाले की, रक्ताचे पाणी करून, पोटाला चिमटा घेत पाई पाई जोडून डोक्यावर छत उभरणाऱ्यांच्या जीवावर हे सरकार उठले आहे. महागाई, बेरोजगारी, असे ज्वलंत प्रश्न उपस्थित असताना आता गरिबांच्या घरावर डोळा ठेवणाऱ्या शिंदे - भाजप सरकार म्हणजे गरिबांचे कर्दनकाळ ठरणारे सरकार असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. सोबतच ग्रामीण भागांत सुरू असलेल्या वाघ हल्ल्याच्या घटनांचा निषेध करीत वन प्रशासनाचे वाभाडे काढले. तसेच जिल्हा बँक नौकर भरती वर स्थगिती आणणारे स्थानीक पालकमंत्र्यांचा नाव न घेता चांगलाच समाचार घेतला. यानंतर मंचावरील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन काँग्रेसचे सावली तालुकाध्यक्ष नितीन गोहने यांनी तर आभार विजय कोरेवार यांनी मांडलेस्थानिक जुन्या नगरपंचायत जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसीलच्या दिशेने मोर्चा मार्गक्रमण झाला. तहसील कचेरीवर धडकलेल्या मोर्चामधील शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले.